एका दिवशी POK चे लोकच म्हणतील ‘आम्हाला भारतात सामील करा’ : J & K चे राज्यपाल मलिक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कमालीचे ताणले आहेत. दरम्यान, नरेंद्र मोदी यांचे कॅबिनेट मंत्री सतत पाकव्याप्त काश्मीरला (POK) देशाचा अविभाज्य भाग बनवण्यास सांगत आहेत. आता जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचीही याबाबतीतील भूमिका पुढे आली आहे.

काय म्हणाले मलिक
पीओके हा देशाचा अविभाज्य भाग आहे यावर भर देऊन राज्यपाल मलिक म्हणाले की, मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्याचे निर्देश दिले आहेत. जम्मूमधील कर्करोग संस्थेच्या पायाभरणी समारंभाप्रसंगी मलिक बोलत होते. ते म्हणाले की असा एक दिवस येईल जेव्हा पीओकेचे लोक नियंत्रण रेखा (LOC) पार करतील आणि पीओकेच्या एकत्रिकरणाची मागणी करतील. मलिक पुढे म्हणाले, ‘देशाच्या दृष्टीने, राज्यपाल फक्त गोल्फ खेळतो आणि लोकांसाठी काहीही करीत नाही. परंतु आम्ही गेल्या १ वर्षात जी कामे केली आहेत, मला वाटत नाही की तेवढी कोणत्याही निवडून आलेल्या सरकारने केले असतील.’

मलिक हे बोलत होते तेव्हा केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंहही तेथे उपस्थित होते. जितेंद्र सिंह यांनी अलीकडेच सांगितले होते की आमचा पुढचा अजेंडा पीओकेला भारताचा अविभाज्य भाग बनवण्याचा आहे.

काय म्हणाले होते जितेंद्र सिंह
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले होते की, आमचा पुढचा अजेंडा पीओके भारतात विलीन करण्याचा आहे. पाकिस्तान-व्याप्त काश्मीरच्या मुद्दय़ावर सिंह म्हणाले होते की, ‘ती केवळ माझी किंवा माझ्या पक्षाची बांधिलकी नाही तर १९९४ मध्ये पीव्ही नरसिंह राव यांच्या नेतृत्वात तत्कालीन काँग्रेस सरकारने मंजूर केलेला सर्वानुमते ठराव होता. हा एक सर्वांना स्वीकार्य असा दृष्टीकोन आहे.’

जितेंद्रसिंग यांच्या विधानानंतर लष्करप्रमुख बिपिन रावत यांनीही सांगितले की सैन्य कोणत्याही मोहिमेसाठी सदैव तत्पर असते. पीओकेशी संबंधित एका प्रश्नावर लष्कर प्रमुख म्हणाले की, पीओकेबाबत सरकार जो निर्णय घेईल त्यानुसार संस्था निर्णय घेतील. सरकारच्या कोणत्याही मोहिमेसाठी सैन्य पूर्णपणे तयार आहे.