26/11 च्या पार्श्वभुमीवर मोठ्या हल्ल्याच्या तयारीत होते नगरोटामध्ये ठार झालेले दहशतवादी; PM मोदींनी बोलावली हाय लेव्हल मीटिंग

श्रीनगर : वृत्तसंस्था –   जम्मू-काश्मीरच्या नगरोटामध्ये दहशतवाद्यांसोबत सुरक्षा दलांच्या झालेल्या चकमकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. पीएम मोदी यांनी या प्रकरणी एक आढावा बैठक बोलावली. या बैठकीत गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला सहभागी झाले होते. सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 26/11 हल्ल्याच्या स्मृतिदिनी एखाद्या मोठ्या हल्ल्याच्या तयारीत दहशतवादी होते.

सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे की, जम्मू-श्रीनगर हायवेवर नगरोटामध्ये मारण्यात आलेले चार दशहतवादी 26/11 च्या हल्ल्याच्या स्मृतिदिनी एखादा मोठा हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत होते. गुरुवारी सकाळी येथे दहशतवादी एका ट्रकमध्ये लपून जात होते. परंतु गुप्तचर यंत्रणांना माहिती मिळाल्याने ते पलायन यशस्वी झाले नाही. या दशहतवाद्यांमध्ये आणि सुरक्षा दलांमध्ये अनेक तास गोळीबार सुरू होता.

सुरक्षा दले बेन टोल प्लाझाजवळ नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करत होते. इतक्यात दशहतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. यानंतर दहशतवादी जंगलाच्या दिशेने पळाले आणि सकाळी 5 वाजता एन्काउंटर सुरू झाले. मीडिया रिपोर्टनुसार, ठार करण्यात आलेले दहशतवादी जैश ए माेहम्मदचे असण्याची शक्यता आहे. जम्मू झोनचे आयजी मुकेश सिंह यांनी म्हटले होते की, हे शक्य आहे की, दहशतवादी आगामी डीसीसी निवडणुकांना लक्ष्य करून मोठ्या हल्ल्याची तयारी करत असावेत. जम्मू-काश्मीरमध्ये डीडीसी निवडणुका 28 नोव्हेंबरपासून 19 दिवसांच्या दरम्यान 8 टप्प्यांत पूर्ण होणार आहेत. मतमोजणी 22 डिसेंबरला होईल.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत 2008 मध्ये 26 नोव्हेंबरला दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यामध्ये लश्कर-ए-तैयबाच्या 10 दहशतवाद्यांनी शहराच्या अनेक भागात हल्ला केला होता. या दहशतवादी हल्ल्यात 166 लोकांचा मृत्यू झाला होता. तर, 300 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते.