‘घुसखोरी’वर भारतीय सैन्याचा जोरदार हल्ला, 4 दिवसात 13 दहशतवाद्यांचा ‘खात्मा’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्याच्या कारवाईत आतापर्यंत 13 अतिरेकी ठार झाले आहेत. जम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना सैन्याने सोमवारी ठार केले. त्याचबरोबर 28 मे पासून सुरू झालेली घुसखोरी रोखण्याच्या मोहिमेत आतापर्यंत चार दिवसात 13 दहशतवादी ठार झाले आहेत.

सैन्याच्या एका अधिकाऱ्याने एका वृत्तवाहिनीस सांगितले की 28 मे पासून घुसखोरीविरोधी मोहीम राबविली जात आहे. त्याअंतर्गत भारतीय सैन्याने पुंछ जिल्ह्यातील मेंढर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या किमान 10 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. पुंछ जिल्ह्यातील खेड्यांमध्ये शोध मोहीम सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

तत्पूर्वी, सैन्याने आपल्या निवेदनात म्हटले आहे की सोमवारी नौशेरा सेक्टरमध्ये तीन अतिरेकी ठार झाले. जम्मू काश्मीरच्या नौशेरा येथील भारत-पाकिस्तान सीमेवर काही दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांना भारतीय सैन्याच्या सैनिकांनी नाकाम केले आणि तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

मिळालेल्या माहितीनुसार, नियंत्रण रेषेवरील नौशेरा सेक्टरजवळ दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यानंतर भारतीय सुरक्षा दलाने त्यांना ठार केले. या भागात अद्याप शोध मोहीम सुरू असून सखोल तपास केला जात आहे. सीमेवर पाकिस्तान रेंजर्सच्या मदतीने दहशतवादी सतत भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु प्रत्येक वेळी त्यांचा प्रयत्न भारतीय सुरक्षा दलाच्या तत्परतेमुळे अपयशी ठरतो.