जम्मू-काश्मीर : Covid-19 ची हॉटस्पॉट बनली ‘अनंतनाग पोलिस लाईन’, 78 पोलीस कर्मचारी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरमध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूची 1,289 प्रकरणे नोंदली गेली आहेत. तर आतापर्यंत 15 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान अनंतनाग जिल्हा पोलीस लाईन कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट केंद्र बनले आहेत. आतापर्यंत 78 पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. संक्रमितांमध्ये सिनिअर अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. गेल्या बुधवारी अनंतनाग जिल्हा पोलिस लाईनचे 8 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. यानंतर, आणखी 14 पोलिसांना गुरुवारी कोरोनाची लागण झाली. यानंतर सोमवारी 55 पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. एका वृत्तपत्राच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

ज्या पोलिसांचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे ते मेस आणि कपड्यांच्या दुकानांवर तैनात होते तसेच काही कर्मचारी गेटवर ड्युटी करत होते. अशा परिस्थितीत या पोलिसांच्या संपर्कात आलेल्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या अशा लोकांना शोधण्याचे काम सुरू झाले आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की दोन आठवड्यांपूर्वी एक विशेष पोलिस अधिकारी कोरोना चाचणीत सकारात्मक आढळले होते, परंतु त्यावेळी काही पोलिसांनाच क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यामुळे हे शक्य आहे की चाचणी आणि ट्रेसिंगमुळे अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात केसेस उद्भवल्या आहेत.

अहवालानुसार, नोडल ऑफिसर डॉ. पीरजदा फरहत यांचे म्हणणे आहे की अनंतनाग पोलिस लाईनमध्ये तैनात एसपीओ ला सुपर स्प्रेडर मानले जात आहे. एसपीओचा भाऊ नुकताच जम्मूहून परतला होता आणि कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले होते. दरम्यान जास्तीत जास्त चाचण्या केल्यामुळे ही प्रकरणे समोर आली आहेत. त्याचवेळी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मुख्तार अहमद म्हणतात, ‘एसपीओच्या भावाव्यतिरिक्त त्यांची पत्नी देखील जम्मूला गेली होती आणि त्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. मला वाटते की एसपीओची पत्नी संक्रमण पसरविण्यासाठी अधिक जबाबदार आहे. एसपीओच्या पत्नीचे वडीलही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे.’