5 महिन्यानंतर पुन्हा भक्तांना मिळणार माताचं दर्शन, 16 ऑगस्टपासून सुरू होईल वैष्णोदेवी यात्रा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वैष्णो देवीच्या दर्शनाची इच्छा असलेल्या भाविकांची प्रतीक्षा आता संपली आहे. जम्मू-काश्मीर प्रशासनाने १६ ऑगस्टपासून दीर्घकाळ बंद असलेल्या धार्मिक स्थळांना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूमुळे १९ मार्च रोजी या यात्रेवर बंदी घालण्यात आली होती.

मात्र वैष्णो देवीची यात्रा सुरू करण्याचा शासकीय आदेशात वेगळा उल्लेख केलेला नाही, पण ही यात्रा अन्य धार्मिक स्थळांप्रमाणेच सुरू केली जाईल, असे सांगितले जात आहे. मात्र भाविकांची संख्या मर्यादित असू शकते.

जम्मू-काश्मीरचे प्रधान सचिव रोहित कंसल म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील सर्व धार्मिक स्थळे १६ ऑगस्ट २०२० पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु धार्मिक मिरवणुका आणि मोठ्या धार्मिक कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही.

हेलिकॉप्टर भाड्यात ६५ टक्के वाढ
यादरम्यान हेलिकॉप्टर सेवेचे भाडे वाढले आहे. वैष्णो देवीच्या दर्शनासाठी हेलिकॉप्टरच्या भाड्यात ६५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. या हेलिकॉप्टर सेवेसाठी नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे वाढीव भाडे १ एप्रिल २०२० पासून लागू होईल.

म्हणजे जेव्हा ही सेवा सुरू होईल तेव्हा भाविकांना हे वाढलेले भाडे द्यावे लागेल. सध्या कटरा ते सांझी-छट येथे जाण्यासाठी हेलिकॉप्टरचे भाडे १०४५ रुपये होते, आता ते वाढवून १७३० करण्यात आले आहे. पहिले हेलिकॉप्टरने येण्या-जाण्याचे भाडे २०९० रुपये होते, आता प्रवाशांना ३४६० रुपये द्यावे लागतील.

वैष्णो देवी यात्रेसाठी आपली सेवा देणाऱ्या हिमालयन हेली आणि ग्लोबल व्हेक्ट्रा कंपन्यांच्या निविदा दर ३ वर्षांनी रिन्यू होतात. नव्या निविदेनुसार भाविकांना यापूर्वी सेवा पुरवणाऱ्या या दोन्ही हेलिकॉप्टर कंपन्याच त्यांच्या सेवा सुरू ठेवतील.