जम्मू-काश्मीर BJP अध्यक्ष रविंदर रैना COVID-19 ने संक्रमित, जितेंद्र सिंह, राम माधव सेल्फ क्वारंटाइन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा येथे दहशतवाद्यांकडून ठार मारले गेलेले भाजप नेते वसीम बारी यांच्या निवासस्थानी अनेक नेत्यांसह भेट देणारे भाजपचे प्रमुख रविंदर रैना कोरोना संक्रमित आढळले आहेत. त्यांनी स्वत: मंगळवारी ही माहिती दिली. भाजपचे माजी अध्यक्ष वसीम बारी, त्यांचे वडील आणि भाऊ यांच्या अंत्य संस्कारात सहभागी होण्यासाठी ते उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा भागात गेले होते, असे रैना यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात बारी, त्यांचे वडील व भाऊ यांना दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केले होते.

रविवारी भाजपचे सरचिटणीस राम माधव, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, रैना आणि अन्य पक्ष नेत्यांनी बारी यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. एका वृत्तसंस्थेनुसार, रैना यांनी फोनवर सांगितले की, “मला कोविड-१९ ची लागण झाली आहे. मी उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा भागात भाजप नेते, त्यांचे वडील आणि भाऊ यांच्या अंत्य संस्कारांना उपस्थित राहण्यासाठी गेलो होतो. मी गेल्या पाच दिवसांपासून तिथे होतो.” रैना यांना रियासी जिल्ह्यातील कटरा भागातील नारायण रुग्णालयात उपचारासाठी पाठवले जात आहे. ते सोमवारी कोविड-१९ ने संक्रमित आढळले होते.

रैना यांनी केले होते बारी यांच्या अंत्ययात्रेचे नेतृत्व
बांदीपोरा येथे रैना यांनी ११ जुलै रोजी पक्षाचे सरचिटणीस अशोक कौल यांच्यासह अंत्ययात्रेचे नेतृत्व केले होते. रैना म्हणाले की, अतिरेक्यांच्या धमकीनंतरही ते अन्य नेत्यांसह अंत्यसंस्कारात सहभागी झाले. ते म्हणाले की, बांदीपोरामध्ये कोविड-१९ ची प्रकरणे वाढत असतानाही भाजपने पीडित कुटुंबासह राहण्याचा निश्चय केला होता.

रैना यांच्या कोविड-१९ ने संक्रमित असल्याच्या बातमीनंतर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ट्विट करून माहिती दिली आहे की, ते सेल्फ क्वारंटाइन राहतील. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्वीट करून माहिती दिली की- “जम्मू-काश्मीरचे भाजप अध्यक्ष श्री. रविंदर रैना १२ जुलै रोजी आमच्यासह श्रीनगरहून बांदीपोरा येथे गेले होते, ते कोरोना संक्रमित असल्याची बातमी मिळाल्यानंतर मी आज दुपारी ४ वाजेपासून ताबडतोब सेल्फ क्वारंटाइन आहे.”

तसेच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव हेही या दौऱ्यावर रविंदर रैना यांच्यासह होते. ही बातमी समजताच राम माधवही सेल्फ क्वारंटाइन आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like