काश्मीरमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई ! 24 तासात 7 दहशतवाद्यांचा ‘खात्मा’

पुलवामा : वृत्तसंस्था – काश्मीर खोऱ्यातून देशविरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात सैन्य दलाच्या सातत्याने मोहिमा सुरु आहेत. पुलवामातील झादुरा भागात पोलीस आणि सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री 1 वाजल्यापासून पोलीस आणि सुरक्षा दलांकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. या चकमकीत एक जवान जखमी झाला आहे. या जवानाला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस आणि सुरक्षा दलाला झादुरा परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन मोहीम राबवण्यात आली. यावेळी एका ठिकाणी संशयास्पद हालचाली दिसल्याने सुरक्षा दलानं परिसराला घेराव घालून सरेंडर होण्याचं आवाहन केलं, मात्र दहशतवाद्यांनी सरक्षकांच्या दिशेने गोळीबार सुरु केला.

24 तासात 7 दहशतवाद्यांचा खात्मा
काश्मीरमध्ये गेल्या 24 तासात सुरक्षा दलानं मोठी कारवाई केली आहे. शोपियानं इथे शुक्रवारी सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. काश्मीर पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी शोपियांच्या किल्लोर भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. शनिवारी पुन्हा एकदा चकमक झाल्यानं 24 तासांत दुसरी चकमक असल्याचं सांगितलं जात आहे. शुक्रवारी झालेल्या चकमकीत चार अतिरेकी ठार झाले, तर एकाला पकडण्यात यश आलं.