जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला 7 महिन्यांनंतर नजरकैदेतून मुक्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांना नजरकैदेतून मुक्त करण्यात आले आहे. गेल्या वर्षी 5 ऑगस्टपासून ते नजरकैदेत होते. अब्दुल्ला हे सुमारे साडेसात महिने नजरकैदेत होते. 5 ऑगस्टला जम्मू-काश्मीरमधून 370 हा कलम हटवल्यामुळे घाटीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्थानिक नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. यात फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती आणि सज्जाद लोन यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश होता.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सफिया आणि बहीण सुरैया यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या दोघी आर्टिकल 370 हटविण्यास विरोध करीत होत्या. मात्र, नंतर त्यांना सोडण्यात आले होते.

अलीकडेच जम्मू-काश्मीरमधील तीन माजी मुख्यमंत्र्यांना ताब्यात ठेवल्याबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले होते की, ते स्वत: या तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या सुटकेसाठी प्रार्थना करीत आहेत. सिंह यांनी आशा व्यक्त केली होती की, त्यांची सुटका झाल्यानंतर काश्मीरची परिस्थिती सामान्य बनवण्यासाठी आणि विकासात आणण्यासाठी या तीन माजी मुख्यमंत्र्यांचे योगदान असेल.