J & K : शोपियानमध्ये भारतीय लष्कराला मोठं यश ! 4 दहशतवाद्यांचा ‘खात्मा’, ‘सर्च ऑपरेशन’ सुरू

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात रविवारी सकाळपासूनच दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात चकमकी सुरू आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी 4 दहशतवादी ठार केले आहेत. 2 ते 3 दहशतवादी अजूनही लपलेले असू शकतात असे सांगण्यात येत आहे. रविवारी सकाळपासूनच त्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. सुरुवातीच्या गोळीबारानंतर रेबन गावात गोळीबार थोडा वेळ थांबला होता, जो पुन्हा एकदा सुरू झाला आहे. सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांचा शोध घेणे सुरु होते, तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला.

सुरक्षा कर्मचार्‍यांपासून बचाव करण्यासाठी हिजबुल दहशतवाद्यांचा एक मोठा गट एका घरात लपला असल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास 5-6 हिजबुल दहशतवादी घरात लपून बसले होते. सुरक्षा कर्मचार्‍यांनी आजूबाजूच्या परिसरास सर्व बाजूंनी घेरले असून त्यांना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील रेबेन भागात रविवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये तेव्हा चकमक सुरु झाली, जेव्हा जवानांची शोधमोहीम सुरु होती. खरं तर, दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती समजताच शोपियानच्या रेबन गावाला घेरल्यानंतर सुरक्षा दलाने शोध मोहीम सुरू केली. असा विश्वास होता की दोन ते तीन अतिरेकी कदाचित त्या भागात लपले असतील.

सुरक्षा दलाची संयुक्त टीम संशयास्पद ठिकाणी पोहोचली तेव्हा लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याच वेळी सुरक्षा दलानेही प्रत्युत्तरात गोळीबार केला आणि मग चकमकीला सुरुवात झाली. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सुरक्षा दलांची संयुक्त टीम आणि दहशतवाद्यांमधील चकमकीची पुष्टी केली आहे.