LoC वर BAT घुसखोरांचा प्रयत्न ‘अयशस्वी’, भारतीय सैन्याने ‘अशा’ प्रकारे साधला ‘निशाणा’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-कश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती चालूच आहेत. पाकव्याप्त काश्मीरच्या लाँचिंग पॅडवरून दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा नवीन व्हिडिओ समोर आला आहे. भारतीय फौजेने 12 आणि 13 सप्टेंबरला बॉर्डर अ‍ॅक्शन टीमने त्यांचे प्रयत्न हाणून पाडत 4 ते 5 अतिरेक्यांना कंठस्नान घातले आहे.

काश्मीरमध्ये परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानची पोलखोल करणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. सैन्याच्या सूत्रांनी दिलेल्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी अतिरेकी भारतीय सीमारेषेवर घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपचा कमांडो आणि दहशतवाद्यांच्या ग्रुपजवळ अंडर बॅरल ग्रेनेड लाँचर होते. मागील आठवड्यात जम्मू-काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये सुरक्षा दलांनी पाकिस्तानच्या मोठ्या षड्यंत्राला हाणून पाडले होते. तसेच या अतिरेक्यांवर भारतीय सुरक्षा दलांनी ग्रेनेडने हल्ला करून त्यांचा खात्मा केला.

लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीरमध्ये सातत्याने अतिरेकी कारवाया करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या अतिरेक्यांचा भारतीय सुरक्षा दलाने तब्बल 15 वेळा डाव उधळला आहे. गुरेज, मच्छल, केरन, तंगधार, उरी, पुंछ, नौशेरा, सुंदरबनी, आरएस पुरा, रामगढ़, कठुआ यांसारख्या क्षेत्रांत 250 पेक्षा जास्त अतिरेकी आहेत.

सैनिकांचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी सफेद झेंडा दाखवण्याची नामुष्की –

पाकिस्तानने हाजीपूर सेक्‍टरमध्ये 10 आणि 11 सप्टेंबरला शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होत. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबाराला भारतीय लष्करानं जोरदार प्रत्त्युतर देत पाकिस्तानी सैनिकांना मारले होते. त्यानंतर पाकिस्तानी सैनिकांवर सफेद झेंडा दाखवून ठार झालेल्या सैनिकांचे मृतदेह ताब्यात घेण्याची नामुष्की ओढवली होती.