J-K : राजौरीमध्ये पाकिस्तानचं कृत्य, सीमेवरील फायरिंगमध्ये लष्कराचा हवालदार शहीद

श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने पुन्हा एकदा सीजफायर नियमाचे उल्लंघन करत गोळीबार केला. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला. माहितीनुसार, भारताकडून पाकिस्तानी गोळीबाराला उत्तर दिले जात आहे.

मागील आठवड्यात पाकिस्तानी सैनकांनी जम्मू-काश्मीरमध्ये उरी सेक्टरपासून गुरेज सेक्टरच्या दरम्यान नियंत्रण रेषेवर (एलओसी) अनेक ठिकाणी सीजफायरचे उल्लंघन केले होते. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या या गोळीबारात भारताचे 4 जवान शहीद झाले होते. यासोबतच आणखी 6 लोकांचा मृत्यू झाला होता.

उरीमध्ये विविध स्थानांशिवाय, बांदीपुरा जिल्ह्याच्या गुरेज सेक्टर आणि कुपवाडा जिल्ह्याच्या सेक्टरमध्ये सीजफायरचे उल्लंघन झाल्याची माहिती मिळाली होती, ज्यानंतर दिलेल्या खोट्या स्पष्टीकरणावरून भारताने पाकिस्तानला सुनावले होते. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, पाकिस्तानकडून करण्यात आलेली प्रेस कॉन्फरन्स भ्रम पसरवणारी आणि भारताविरोधात प्रोपेगंडा चालवण्याच्या धोरणाचा भाग आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटले की, पाकिस्तान खोटे बोलत आहे. पाकिस्तानच्या कारवाया जगाला माहिती आहेत आणि पाकच्या जमिनीचा वापर दहशतवाद पोसण्यासाठी केला जातो हे पाक सरकारने मान्य केले आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटले की, जागतिक दहशतवादाचा चेहरा ओसामा बिन लादेन पाकिस्तानमध्येच सापडला होता. इम्रान खान यांनी संसदेत त्यास शहीद म्हटले आहे. त्यांनी पाकिस्तानमध्ये 40 हजार दहशतवादी असल्याचे मान्य केले आहे. पाकिस्तानच्या तंत्रज्ञान मंत्र्याने गर्वाने या गोष्टीची कबुली दिली आहे की, ज्या पुलवामा हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. त्यामध्ये पाकिस्तानचा हात होता.