काश्मीरमध्ये टळला मोठा आतंकवादी हल्ला, ‘पुलवामा’ सारखा होता ‘कट’, वेळेपूर्वीच ‘निष्क्रिय’ केला IED (व्हिडीओ)

श्रीनगर : वृत्त संस्था – जम्मू काश्मीर मधील पुलवामा सारखा अतिरेकी हल्ला पुन्हा घडवून आणण्याची अतिरेक्यांचा आत्मघातकी प्रयत्न पोलीस, सीआरपीएफ आणि लष्कराने हाणून पाडला. लष्कराने पुलवामामधील अयानगुंड परिसरात आईईडी विस्फोट भरलेली एक सँट्रो कार ताब्यात घेतली आहे. ही कार दुसरीकडे घेऊन जाणे शक्य नसल्याने सैन्याने विस्फोटकांनी भरलेली ही कार नियंत्रित पद्धतीने स्फोट घडवून आणून ती नष्ट केली. या स्फोटामुळे आजूबाजूच्या काही घरांचे नुकसान झाले आहे.

१४ फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांचा गाड्यांचा ताफा जात असताना विस्फोटकांनी भरलेली कार या गाड्यांवर जाऊन धडकवून तिचा स्फोट घडवून आणला होता. जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. त्याचा बदला भारताने बालाकोट येथील अतिरेक्यांच्या तळावर हवाई हल्ला करुन घेतला होता.

या हल्ल्याप्रमाणेच पुन्हा हल्ला करण्याचा अतिरेक्यांचा प्रयत्न होता. सुरक्षा दलांना पुलवामामधील अयानगुंड परिसरात एक पांढर्‍या रंगाची संशयास्पद सँट्रो कार आढळून आली. तिची तपासणी केल्यावर तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विस्फोटक भरली असल्याचे आढळून आले. त्यामुळे लष्कराने ही कार स्फोटकासह उडवून दिली आहे.