जम्मू-काश्मीर : ‘महाशिवरात्री’ला आत्मघातकी हल्ल्याच्या प्रयत्नात ‘जैश’, सर्व पोलिस अधिकार्‍यांच्या सुट्ट्या रद्द

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मद अतिरेकी संघटना शिवरात्रानिमित्त मोठ्या आत्मघाती हल्ल्याच्या प्रयत्नात असून सुरक्षा दलाच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला आणि सामान्य लोकांना लक्ष्य करुन दहशतवादी घटना घडविण्याचा कट रचणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. यानंतर सुरक्षा यंत्रणा आणि पोलिस ठाण्यांना सतर्क करण्यात आले आहे. त्याचबरोबर सर्व पोलिस अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या 21 फेब्रुवारीपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जैशच्या तीन ते चार दहशतवाद्यांचा समूह काश्मीरमध्ये आत्मघाती हल्ले करण्याची शक्यता आहे. असा हल्ला सीमापार दहशतवादी संघटनांच्या संयुक्त बैठकीत करण्यात आला असल्याचे समजते. त्यानुसार जैशचे काही दहशतवादी पठाणकोट, कठुआ आणि सांबा येथून घुसू शकतात. तसेच या हल्ल्यात काश्मीरमधील स्थानिक दहशतवाद्यांचादेखील वापर करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण, गेल्या वर्षी 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्यात स्थानिक दहशतवाद्यांचादेखील सहभाग होता.

साधूंच्या वेशात दहशतवादी घुसखोरी करण्याची शक्यता :
मिळालेल्या माहितीनुसार, जैशचे दहशतवादी एका संन्यासीच्या वेशात घुसखोरी करू शकतात तसेच शिवरात्रीनिमित्त कांवडींवरही हल्ला करु शकतात. अशा परिस्थितीत विशेषत: कांवडियांच्या जाणाऱ्या रस्त्यावर सुरक्षा दलांची गस्त वाढविण्यात आली आहे.

जानेवारीत ५ अतिरेकी अटक :
दरम्यान, यापूर्वी जम्मू-काश्मीर पोलिसांनी जैशचा मोठा कट हाणून पाडला होता. प्रजासत्ताक दिनी आत्मघाती हल्ल्याच्या प्रयत्नात असलेल्या जैश संघटनेच्या ५ दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीर पोलिसांनी जानेवारीत अटक केली होती. अटक केलेल्या दहशतवाद्यांपैकी एजाज अहमद शेख, उमर हमीद शेख, इम्तियाज अहमद चिकला, साहिल फारूकी गजरी आणि नसीर अहमद मीर यांचा समावेश आहे.