भारतीय लष्कराला पुन्हा एकदा मोठं यश, केला 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 4 दिवसात 12 अतिरेक्यांना कंठस्नान

पोलिसनामा ऑनलाईन – दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील सुगो हेंधमा येथे आज सकाळी भारतीय सैन्य आणि दहशतवादी यांच्यात पुन्हा चकमक झाली. दोन्ही बाजूंकडून झालेल्या गोळीबारात 3 दहशतवादी ठार झाले आहेत. भारतीय सुरक्षा दलाने अजूनही संपूर्ण परिसर घेरला असून या भागात शोध मोहीम राबविली जात आहे. मुख्य म्हणजे शोपियान जिल्ह्यात चार दिवसात तीन वेगवेगळ्या चकमकीत एकूण 12 दहशतवादी ठार झाले आहेत.

भारतीय सुरक्षा दलाला दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील सुगो हेंधामा येथे काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सैन्य, पोलीस आणि सीआरपीएफची संयुक्त टीम तयार करण्यात आली होती. भारतीय सैनिकांनी परिसराला घेराव घालून शोध मोहीम सुरू केली. पकडले जाण्याच्या भीतीने घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सैन्यावर गोळीबार सुरू केला. दोन्ही बाजूंकडून गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले. या भागात आणखी बरेच दहशतवादी लपवल्याची माहिती लष्कराला मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

भारतीय सुरक्षा दलाने काश्मीरमधील दहशतवाद्यांचा पूर्णपणे खात्मा करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. याआधी शोपियांच्या रेबन गावात सैनिकांनी हिज्बुलच्या टॉप कमांडरसह पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला. दुसर्याच दिवशी शोपियानच्या पिंजुरा भागात सोमवारी सकाळी झालेल्या चकमकीत 4 दहशतवादी ठार झाले. जानेवारी ते 8 जून या सहा महिन्यांमध्ये सुरक्षा दलांनी तब्बल 101 दहशतवाद्यांचा खात्मा केला. यानंतर सुरक्षा दलांनी आणखी 125 दहशतवाद्यांची हिट लिस्ट तयार केली असून त्यात त्यात 25 विदेशी दहशतवाद्यांचा समावेश आहे अशी माहिती लष्कराच्या 15व्या कोअर कमांडचे नेतृत्व करणारे लेफ्टनंट जनरल बी.एस.राजू यांनी दिली.