जामनेर : रुबाब दाखविणार्‍या भाजप पदाधिकार्‍याला पत्नीसमोर पोलीस निरीक्षकाने चोपले

जामनेर : रस्त्यात कार लावून भाजी आणण्यासाठी गेलेल्या व वाहतूकीला अडथळा आणण्यानंतरही पोलिसांकडे दुर्लक्ष करणार्‍या भाजप पदाधिकार्‍याला पत्नीसमोर पोलीस निरीक्षकाने चोप दिल्याची घटना बोदवड येथे घडली. त्याची तक्रार थेट पोलीस अधीक्षकांपर्यंत पोहचली आहे.

याबाबतची माहिती अशी, जामनेर तालुक्यातील पाळधी येथील भाजपचे पदाधिकारी संतोष चौधरी हे शिरसाळा मारुतीचे दर्शन घेण्यासाठी सहकुटुंब आले होते. त्यानंतर परत जाताना त्यांनी बोदवड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ कार रस्त्यात उभी केली, त्यांची पत्नी भाजी घेण्यासाठी खाली उतरल्या. त्यांच्या मागून पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांचे वाहन जात होते. वाहतूकीला अडथळा ठरत असल्याने त्यांनी चौधरी यांच्या वाहनाला आवाज दिला. बराचवेळ त्याने कार बाजूला न घेतल्याने गायकवाड हे गाडीतून खाली उतरले व त्यांनी गाडीचे साईड ग्लासवर काठी मारुन चौकशी केली. तेव्हा गाडीमालक चौधरी तेथे आला व त्याने पोलीस निरीक्षक यांच्याशी अरेरावी करण्यास सुरुवात झाली. त्यांची पत्नीही त्यावेळी बरोबर होत्या. चौधरी याची अरेरावी ऐकून गायकवाड यांनी जागेवरच चौधरी याला बदडले आणि पोलीस वाहनात बसवून पोलीस ठाण्यात आणले. तेथेही त्याने राहुल गायकवाड यांच्याशी वाद घातला. संतोष चौधरीच्या पत्नीने तुम्ही एका महिलेला असभ्य वागणूक देत असल्याचा आरोप केला. सुमारे तासभर हा प्रकार सुरु होता.

हे सर्व प्रकरण जामनेरचे आमदार गिरीश महाजन तसेच माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यापर्यंत पोहचले. त्यातून भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात आले. पण कोणीच माघार घेत नसल्याने शेवटी बोदवड पोलिसांनी चौधरीवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला. संतोष चौधरी याला मारहाण केल्याचा व्हिडिओ जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पाठविल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.