…म्हणून भारताचा फुटबॉलपटू करतोय ‘हेल्पलाईन’ सेंटरवर काम

पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात कोरोनामुळे हाहाकार उडाला असल्यामुळे अनेजण एकमेकांना मदतीचा हात देत आहेत. सर्वसामान्य नागरिक ते उद्योगपतींनी भरघोस मदत देउन सरकारला बळ दिले आहे. कोरोनामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा बंद पडल्यामुळे बीसीसीआयपासून सर्व महत्वाच्या क्रीडा स्पर्धा अनिश्चीत काळासाठी रद्द केल्या आहेत. या खडतर काळात भारताचा फुटबॉलपटू सी.के.विनीतने एक नवीन आदर्श घालून दिला आहे. विनीत केरळ सरकारच्या करोनाविरुद्ध हेल्पलाईन सेंटरवर नागरिकांना या विषाणूविरोधात लढण्यासाठी मदत करत आहे.

विनीतने आतापर्यंत सात आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय फुटबॉल संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे, तर आयएसएल स्पर्धेत तो जमशेदपूर संघाचे प्रतिनिधीत्व करतो.अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात विनीतने, मी ज्यावेळी केरळमध्ये परत आलो, त्यावेळी कामाबद्दल विचारण्यात आले होते. त्यानुसार सध्याच्या खडतर काळात माझ्याकडून जी काही मदत होणे शक्य आहे ती मी करत असल्याची प्रतिक्रीया दिली आहे.

विनीत हा केरळमधला सर्वात प्रसिद्ध फुटबॉलपटू असून 28 मार्चपासून विनीतने केरळमधील हेल्पलाईन सेंटरवर काम करायला सुरुवात केली आहे. लॉकडाउन पूर्णपणे बंद होईपर्यंत काम सुरु ठेवणार असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. हेल्पलाईन सेंटरमध्ये विनीत आणि इतर कर्मचारी सरकारने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करत आहेत. ग्लोव्हज, मास्क, सॅनिटायर या सर्व सुविधा कर्मचार्‍यांना उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.अशा खडतर परिस्थिती सर्व नागरिकांनी घरात राहून सरकारी यंत्रणांना मदत करण्याचे आवाहन त्याने केले आहे.