देशभरात ‘जनता कर्फ्यु’ ! सर्वत्र संचारबंदीसारखी स्थिती, रस्त्यांवर ‘शुकशुकाट’, मुंबईत लोकल अंशतः सुरू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार रविवारी सकाळपासूनच जनता कर्फ्यु सुरु झाला असून मुंबई, पुण्यासह देशभरातील रस्त्यांवर सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे. रेल्वे, एस टी बस, बेस्ट, पीएमपी या काही प्रमाणात धावत असल्या तरी त्यामुळे प्रवासी केवळ नाममात्र दिसून येत आहे. मुंबईची लाईफ लाईन असलेली लोकल आज अंशत: सुरु राहणार आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून 31 मार्चपर्यंत अनावश्यक लोकल प्रवाशांवर निर्बंध लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि वैद्यकीय इमर्जन्सी असल्याशिवाय लोकल प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली असल्याची माहिती कोकण विभागीय आयुक्तांनी दिली आहे.

देशभरातील काही हजार एक्सप्रेस, मेल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. आपल्या गावाला जाण्यासाठी आजही मुंबईतील विविध टर्मिनलवर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. मुंबईतील ओसंडून वाहणारे रस्ते आज जवळपास निर्मनुष्य झालेले दिसून येत आहे. एखाद दुसरा वाहनचालक जाताना दिसून येत आहे.
पुण्यात सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या असल्याने आज सकाळपासूनच पुणेकर जनता कर्फ्युमध्ये सहभागी झाल्याचे दिसत आहे. नेहमी गजबलेले रस्ते ओस पडले आहेत. मात्र, त्याचवेळी काही ठिकाणी लोक सकाळी सकाळी व्यायाम करायला बाहेर पडलेले दिसून आले. पीएमपी बस काही प्रमाणात सुरु आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त दिसून येत आहे. कोणी रस्त्यावरुन जाताना दिसत असल्यास त्याच्याकडे विचारणा केली जाताना दिसते. राज्यातील सर्व शहरांमध्ये जनता कर्फ्यु नागरिक स्वयंशिस्त पाळून प्रतिसाद देताना दिसून येत आहे.