‘बाळासाहेबांनीच भाजपाला महाराष्ट्रात स्थान दिलं’, ‘या’ माजी पंतप्रधानांनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपने सत्तास्थापनेस नकार दिल्यानंतर आज संध्याकाळी 7.30 पर्यंत शिवसेनेला राज्यपालांनी वेळ दिली आहे. त्यामुळे राज्यातील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्रातील या राजकीय घडामोडींवर भाष्य करत महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांनीच भाजपला महाराष्ट्रात स्थान दिल्याची आठवण माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांनी करून दिली आहे.

शिवसेनेच्या भूमिकेचं समर्थन करताना एच डी देवेगौडा म्हणाले की, ‘अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी हे भाजपचे ज्येष्ठ नेते तेव्हा बाळासाहेबांच्या घरी युती करण्यासाठी विनंती करायला गेले होते. काही जागा भाजपला सोडाव्या असा आग्रह त्यांनी धरला होता. त्यातूनच युती झाली होती. मात्र भाजपला आज त्याचा विसर पडला आहे. म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी भाजपला धडा शिकवण्यासाठी टोकाचे पाऊल उचलले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे भाजपाला खाली खेचण्याची संधी आहे.’

याशिवाय जर काँग्रेसने शिवसेनेला समर्थन दिलं तर त्यांनी पाच वर्ष पाठिंबा कायम ठेवला पाहिजे. त्यानंतर लोकांचा काँग्रेसवर विश्वास बसेल, असं मतही एच डी देवेगौडा यांनी व्यक्त केलं आहे.

विशेष म्हणजे कर्नाटकात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी देवेगौडा यांचे पुत्र कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यात आले होते. काँग्रेसच्या पाठिंब्यावर हे सरकार स्थापन झालं होतं. मात्र हे सरकार अल्पजीवी ठरलं होत.

Visit : Policenama.com