जपानमध्ये कोरोना’वरील उपायासाठी भारतीय ‘आयुर्वेद काढा’; पुण्यातील डॉक्टरांच्या संशोधनाचा घेतला आधार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘लस’ बाजारात उपलब्ध झाली आहे. मात्र, कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. जगात आता कोरोनाची तीसरी लाट येऊ घातल्याचे संकेत मिळू लागले आहेत. कोरोनाचा तिसरा नवा स्ट्रेन सापडल्याचा दावा करण्यात येत आहे. तर डबल म्यूटेंशने पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होऊ लागला आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. कोरोनावर उपाय म्हणून जपान भारतीय आयुर्वेद काढ्याचा वापर करणार आहे. कोरोनावरील उपचार पद्धतीमध्ये भारतीय आयुर्वेद काढा वापरण्याचा निर्णय जपानमधील इजुमियोत्स या शहराच्या महापौरांनी घेतला आहे. यासाठी पुण्यातील वैद्याचा त्यामध्ये सहभाग असणार आहे.

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात येत असताना जपानने आयुर्वेदाला महत्व दिले आहे. जपानने कोरोनावरील उपाचार पद्धतीला प्राधान्य देताना पुण्यातील डॉ. सुकुमार सरदेशमुख यांच्या संशोधनाचा आधार घेतला आहे. कोरोनावर कोणतेही औषध नसल्यामुळे जगभरातील विविध पर्यायांची चाचपणी करण्यात येत आहे. जपानने कोरोनावर उपचार करण्यासाठी नैसर्गिक उपचार पद्धतीला प्राधान देण्याचे ठरवले आहे. यासाठी नैसर्गिक, रसायनांशिवाय उपचारांना पसंती दिली आहे. त्यासाठीच भारतीय काढ्याचा समावेश करण्यात आला आहे.

महापौर केनिची मिनामिडे यांनी कोरोनावरील उपचारावर अभ्यास करण्यासाठी आणि संशोधनासाठी मदत व्हावी यासाठी ऑनलाईन चर्चासत्र घेतले होते. या चर्चासत्रामध्ये पुण्यातील वैद्य सुकुमार सरदेशमुख यांना निमंत्रीत करण्यात आले होते. सुकुमार सरदेशमुख यांनी संशोधनाद्वारे तयार केलेल्या आयुर्वेदिक काढ्याचा चांगला उपयोग होत असल्याचे चर्चासत्रात म्हटले. त्यांनी कोविड आणि कोविडोत्तर काळात काढ्याचा आम्ही वापर करणार असल्याचे सांगितले. यावेळी जपान सरकारचे डॉ. मोटोको साते आणि डॉ. माकिकी सातो या चर्चासत्रात सहभागी झाले होते.

वैद्य सुकुमार सरदेशमुख यांनी सांगितले की, आम्ही तयार केलेला काढा उत्तम प्रतिचा आहे. आमच्या कंपनीने तयार केलेला काढा त्यांना पाठवला होता. आम्ही तयार केलेला काढा गुणकारी सिद्ध होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी मला चर्चासत्रात सहभागी करुन घेतले. याचा आम्हाला अभिमान आहे. तुळस, अश्वगंधा, सुंठ, दालचिनी, लवंग, गुळवे, ज्येष्ठमध या औषधी वनस्पतींचा यामध्ये वापर करण्यात आला आहे. एकात्मिक उपचार पद्धतीमध्ये हा काढा वापरला जाणार आहे, अशी माहिती वैद्य सरदेशमुख यांनी दिली.