काळे झाले मॉरिशियसच्या समुद्रातील पाणी, सरकारनं जाहीर केली ‘आणीबाणी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या स्वच्छ पाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मॉरिशियसचे समुद्रकिनारे आता काळे दिसत आहेत. समुद्रकिनारी असलेले समुद्राचे पाणी काळे आहे आणि हजारो लोक ते स्वच्छ करत आहेत. मॉरिशियसच्या सुंदर किनारपट्टीची ही परिस्थिती एका जपानी तेलाच्या टँकर जहाजामुळे (Japanese carrier spills 1000 tonnes of crude oil) झाली आहे, जे २५ जुलैपासून मॉरिशियसच्या दक्षिणपूर्व किनाऱ्यावर अडकले आहे आणि त्यातून कच्चे तेल बाहेर पडत आहे. एका अंदाजानुसार, टँकरमधून आतापर्यंत १००० टन तेल वाहून गेले आहे, ज्यामुळे समुद्राचे पाणी काळे झाले आहे आणि मॉरिशियसने ‘पर्यावरणीय आणीबाणी’ जाहीर केली आहे.

एका वृत्तसंस्थेनुसार, एमव्ही वाकाशिवो नावाचा हा तेल टँकर २५ जुलैपासून अडकला आहे आणि त्यातून होणाऱ्या तेल गळतीमुळे मॉरिशियसचे सौंदर्य नष्ट झाले आहे. मॉरिशियसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांनी पर्यावरणीय आणीबाणीची घोषणा केली आहे आणि म्हटले आहे की यामुळे देशासाठी धोका निर्माण झाला आहे. जगन्नाथ यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मदत मागितली आहे. पर्यावरण रक्षणासाठी काम करणाऱ्या ग्रीनपीसचे म्हणणे आहे की, यामुळे मॉरिशियसमध्ये आतापर्यंतचे सर्वात भीतीदायक पर्यावरण संकट निर्माण होईल. यामुळे सागरी प्राणी तसेच पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या सॅटेलाईट चित्रात समुद्राच्या पाण्यावर गडद तेलाचा रंग पसरताना दिसून आला आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले की, त्यांचा देश मॉरिशियसच्या मदतीसाठी विशेष पथक आणि उपकरणे पाठवत आहे. मॉरिशियसजवळ फ्रान्सचे रियुनिइन बेट आहे. तेथून शनिवारी प्रदूषण नियंत्रण उपकरणांसह सैन्य विमान घटनास्थळावर पाठवण्यात आले आहे.

हजारो सामान्य लोक आले मदतीसाठी
मॉरिशियसमधील लोक या संकटाच्या वेळी पुढे आले आहेत आणि स्वयंसेवक म्हणून समुद्रकिनारे साफ करण्यास सुरवात केली आहे. एका वृत्तसंस्थेनुसार, रविवारी हजारोच्या संख्येत लोक प्रिन्सटन बीच आणि आजूबाजूच्या किनारपट्टीवर स्वच्छता करण्यासाठी मदत कामगारांमध्ये सामील झाले. दुसरीकडे जपानने म्हटले आहे की, ते टँकरमधून होणारी गळती थांबवण्याच्या दिशेने सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, टँकरला बुडण्यापासून वाचवणे जवळजवळ अशक्य आहे आणि परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता अधिक आहे. पीएम जगन्नाथ म्हणाले की, टँकर पूर्णपणे पाण्यात बुडाल्यास परिस्थिती आणखी बिकट होईल आणि समुद्रकिनार्‍यांवर तेल जास्त जमा होईल.

जपानी तेल कंपनी एमव्ही वाकाशिवोनेही एका निवेदनात मॉरिशियसची माफी मागितली आहे. आतापर्यंत केवळ १००० टन तेल गळती झाली आहे, असा कंपनीचा दावा आहे. कंपनीने म्हटले की, जे काही घडत आहे त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत आणि आमच्याकडून जे होईल ते करण्यास आम्ही पूर्णपणे तयार आहोत. चित्रात मॉरिशियसच्या समुद्रकिनाऱ्याची वाईट अवस्था स्पष्टपणे दिसत आहे. पर्यावरणीय यंत्रणांनीही मॉरिशियससाठी चिंता व्यक्त केली आहे आणि याला आपत्ती स्तराची घटना असल्याचे म्हटले आहे.