जसपाल राणा – द्रोणाचार्य, अंजुम मौदगिल – राजीव गांधी खेलरत्न तर ‘या’ 4 दिग्गजांच्या नावांची अर्जून पुरस्कारासाठी ‘शिफारस’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या खेळाडू, प्रशिक्षकांना देण्यात येणाऱ्या अर्जुन, द्रोणाचार्य आणि राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारांसाठी भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेने आपली यादी सरकारला पाठवली आहे. ज्येष्ठ पिस्तुल प्रशिक्षख जसपाल राणा यांना द्रोणाचार्य पुरस्कार देण्याची शिफारस संघटनेतर्फे करण्यात आली आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट खेळाडूंना देण्यात येणाऱ्या अर्जुन पुरस्कारासाठी नेमबाज मनू बाकर, सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा आणि इलावेणील वल्लरिवन यांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे.

राजीव गांधी खेलरत्न या मानाच्या पुरस्कारासाठी रायफल नेमबाज अंजुम मौदगिल यांच्या नावाची शिफारस भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेने केली आहे. केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्या वतीने क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.