कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने जावडेकरांचीही परिक्षा

पुणे  :  पोलीसनामा ऑनलाइन

राजेंद्र पंढरपुरे

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यातील सामना लक्षवेधी ठरला आहे. परंतु पुणेकरांसाठी यात आणखी एक विशेष म्हणजे कर्नाटक भाजपचे प्रभारीपद केंद्रीय शिक्षणमंत्री आणि पुणेकर असलेल्या प्रकाश जावडेकर यांच्याकडे आहे. गेले दोन ते अडीच महिने जावडेकर यांनी कर्नाटकात तळ ठोकलेला आहे.

कर्नाटकातील भाजपची प्रचार यंत्रणा, व्यूहरचना, राष्ट्रीय नेत्यांचे दौरे, उमेदवारांची निवड या सगळ्या निर्णय प्रक्रियेत जावडेकर यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. कर्नाटक हे दक्षिणेकडचे राज्य जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे तर काँग्रेसने हे राज्य परत जिंकून दिल्लीकडे कूच करण्याचे ठरवले आहे. या रणसंग्रामात पुण्यातील नेते प्रकाश जावडेकर यांच्याही राजकीय कौशल्याची परिक्षा पाहिली जात आहे.

भाजपच्या राष्ट्रीय राजकारणात महत्त्व असलेले जावडेकर पुण्यातील नेते आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचे लक्ष जावडेकर यांच्या कर्नाटकातील कामगिरीकडे आहे.