पाण्यात पडलेल्या एका शेळीच्या पिल्लासाठी जवानांची शर्थ

पुणे: पाेलीसनामा ऑनलाईन-अग्निशमन दलाचे जवान आग व आपत्तीविषयक कर्तव्य बजावतातच. पण अशा काही घटना घडतात की हे जवान जीवाची बाजी लावून एखाद्याचे प्राण वाचवतात मग तो मनुष्य असो की पशुप्राणी.

अशीच एक घटना आज(गुरुवार) दुपारी चार वाजता कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्राशेजारी घडली. तिथे शेजारीच असणाऱ्या पाण्याच्या खाणीमध्ये एक शेळीचे पिल्लू पाण्यात पडलेले असून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे जवानांनी पाहिले. त्याचवेळी कोणी ही या घटनेबाबत वर्दि दिली नसली तरी कर्तव्य म्हणून या जवानांनी दलाच्या नियंत्रण कक्षाला ही बाब कळविली व प्रयत्न सुरु केले. जवान मंगेश टकले व मनोज गायकवाड यांनी तातडीने लाईफ जॅकेट परिधान करुन शिडीच्या साह्याने किमान पन्नास फुट खोल असणाऱ्या या खाणीत उतरुन पोहत जाऊन या शेळीच्या पिल्लाची पंधराच मिनिटात सुखरुप सुटका केली. स्वत: जवानांनीच याबाबत समाधान व्यक्त केले.

या कामगिरीमधे फायरमन अजित बेलोसे, मंगेश टकले, रवि बारटक्के, मनोज गायकवाड, मनोज भारती, निलेश राजीवडे, हर्षद येवले व चालक सुखदेव गोगावले यांनी सहभाग घेतला.