‘त्या’ जाहिरातीवर जावेद अख्तर ‘खवळले’, म्हणाले लज्जास्पद आहे ‘ही’ गोष्ट

तिरुअनंतपुरम : जावेद अख्तर हे सामाजिक आणि इतर विषयांवर परखडपणे आणि निर्भयपणे व्यक्त होणारे गीतकार म्हणून ओळखले जातात. ओशिरा कोल्लमच्या स्टार रुग्णालयाने नोकरीसाठी दिलेल्या जाहिरातीत मुस्लिमधर्मीय उमेदवारांना प्राधान्य देणार असल्याचे म्हटले होते. अख्तर यांनी मात्र या वृत्ताबद्दल या रुग्णालयाचा चांगलाच समाचार घेत हि गोष्ट लज्जास्पद असल्याची टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाले गीतकार जावेद अख्तर
जावेद अख्तर यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की , ‘केरळमधील रुग्णालयाची ही कृती लज्जास्पद आहे. अशा प्रकारच्या जाहिरातींनी कोणत्याही नियमांचं किंवा कायद्याचं उल्लंघन कसं होतं नाही याचं मला विशेष वाटतं. अशी कृती करणारी ही माणसं कोणत्या तोंडानं आणि नैतिकतेनं दुसऱ्यांकडून मात्र धर्मनिरपेक्षता आणि न्यायाची मागणी करतात. याबद्दल विचार करुन अशा कर्मठ कट्टरवाद्यांना कायदेतज्ज्ञांनी न्यायालयात खेचायला हवं.’

जावेद अख्तर बऱ्याचवेळा आपल्या विविध वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपुर्वी चर्चेत असणाऱ्या वृत्तानुसार जावेद अख्तर आणि त्यांची पत्नी शबाना आझमीसोबत देश सोडून जाणार असल्याचं म्हटलं जात होत. त्यावेळी असं कोणतंही वक्तव्य कोठेही केलं नसल्याचं अख्तर यांनी स्पष्ट केलं होत.

दरम्यान केरळमधील ओशिरा कोल्लमच्या स्टार रुग्णालयाच्या या जाहिरातीची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात झाली. अनेकांनी या जाहिरातीच्या विरोधात आणि समर्थनार्थ देखिल प्रतिक्रिया दिल्या गेल्या आहेत.