वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान संघाविरोधात खेळण्याबाबत गौतम गंभीरचे मोठे विधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर याने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान संघाविरोधात खेळण्याबद्दल मत व्यक्त केलं आहे. माझ्यासाठी भारतीय जवान क्रिकेटपेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत असं गौतम गंभीरने म्हटलं आहे.

इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तान संघाविरोधात सामना खेळू नये ही मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे हरभजन सिंग, मोहम्मद अझरुद्दीन आणि सौरव गांगुली यांच्यासह आजी- माजी खेळाडूंनी भारताने वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळू नये असे मत व्यक्त केले होते. यामध्ये आता पद्मश्री पुरस्कार विजेता क्रिकेटपटू गौतम गंभीरही सहभागी झाला आहे.२०११ चा वन डे वर्ल्ड कप विजेत्या स्पर्धेतील नायक आणि २००७ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य गंभीरीने केवळ वर्ल्ड कप स्पर्धेतच नव्हे, तर भारताने आयसीसीच्या सर्व प्रमुख स्पर्धांमध्ये पाकविरुद्धच्या सामन्यांवर बहिष्कार घालावा अशी मागणी केली आहे.

दोन गुण गमावले तरी चालेल –

गौतम गंभीर म्हणाला की ,”वर्ल्ड कपच नव्हे, तर आशिया चषक स्पर्धेतही पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर भारताने बहिष्कार घालावा. दोन गुण गमावले तरी चालेल. संपूर्ण देश भारतीय खेळाडूंच्या पाठीशी उभा राहिल आणि उपांत्य किंवा अंतिम फेरीत प्रवेश न केल्यामुळे खेळाडूंना कोणी दोषी धरणार नाही. दोन गुणांपेक्षा माझ्यासाठी देशाचा जवान महत्त्वाचा.”

याआधीही गौतम गंभीरने पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर रोखठोक मत व्यक्त केलं होतं. आता सहनशक्ती संपली आहे असे विधान गंभीरने केले होते.