जय शाह XI ने सौरव गांगुलीच्या संघाविरूद्ध नोंदविला दमदार विजय, दादाने खेळली धुव्वादार इनिंग

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : बीसीसीआयच्या सदस्यांमध्ये झालेल्या मैत्रीपूर्ण सामन्यात जय शाह इलेव्हनच्या संघाने सौरव गांगुलीच्या संघाचा 28 धावांनी पराभव केला. या 12 षटकांच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या शाह इलेव्हनने 3 गडी गमावून 128 धावा केेल्या. प्रत्युत्तरादाखल सौरव गांगुलीचा संघ 4 गडी गमावल्यानंतर 100 धावा करु शकला. या सामन्यात गांगुली फॉर्ममध्ये दिसला आणि 32 चेंडूत 53 धावांची जोरदार खेळी केली तरी तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

माहितीनुसार, जगातील सर्वात मोठे मोटेरा स्टेडियमची व्यवस्था तपासण्यासाठी हा सामना खेळला गेला. जय शाहच्या संघासाठी माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने शानदार फलंदाजी करताना 37 धावा केल्या तर जयदेव शाहने 38 धावांची खेळी केली. मात्र संघाचा कर्णधार जय शाहला फलंदाजीसह काही खास करता आले नाही आणि 6 चेंडूत केवळ 2 धावा करता आल्या. जय ची विकेट सौरव गांगुलीने आपल्या नावे केेेली. गोलंदाजीत जय शाहने त्याच्या 4 षटकांत 39 धावा देऊन 2 विकेट घेतल्या.

दरम्यान, 24 डिसेंबर (गुरुवारी) भारतीय क्रिकेट बोर्डाच्या सर्वसाधारण सभेची 89 वी वार्षिक बैठक होणार आहे, ज्यात आयपीएलच्या दोन नव्या संघांच्या समावेशासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. या बैठकीत बीसीसीआयचे उपाध्यक्ष म्हणून राजीव शुक्ला यांच्या नावाचीही घोषणा केली जाईल, तर ब्रजेश पटेल यांना एकदा आयपीएल चे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले जाऊ शकते.