उन्नाव रेप केस : प्रकरणाचा निषेध करताना जया बच्चन यांच्यासह इतर ‘थट्टा’ मस्करीत ‘मग्‍न’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील या घटनेचे गांभीर्य ओळखून आतापर्यंत अनेक जणांनी या घटनेची निंदा केली आहे. विविध स्तरातून या घटनेचा निषेध करताना नागरिक आढळून येत आहेत. सोशल मीडिया असो किंवा प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून असो, लोक आपल्या परीने या घटनेचा निषेध करताना दिसून येत आहेत.

याच घटनेचा समाजवादी पक्षाचे खासदार निषेध करतानाचा फोटो व्हायरल होत आहे. या बलात्कार प्रकरणाचा निषेध करताना समाजवादी पक्षाचे सर्व खासदार जमले होते. मात्र या गंभीर घटनेच्या वेळी देखील  खासदार जया बच्चन या हसताना दिसून येत आहेत.  त्यामुळे सध्या त्या सोशल मीडियावर मोठा चर्चेचा विषय झाल्या आहेत.

या बलात्कार प्रकरणातील आरोपी भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर यांचा निषेध करण्यासाठी काँग्रेस आणि सपाच्या खासदारांनी निषेध केला. त्यावेळी या महत्वाच्या घटनेचा निषेध करत असताना देखील त्यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे गंभीर भाव नव्हते. त्या आपल्या इतर सहकारी खासदारांबरोबर गप्पा आणि थट्टा मस्करीमध्ये  गुंतल्या होत्या. त्यांचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांना नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ट्रोल केले  तर काही जणांनी त्यांच्यावर टीका  देखील केली.

काही जणांनी त्यांना या घटनेचे गांभीर्य नसल्याचे म्हटले आहे तर काही जणांनी त्यांना नाटकी म्हणत त्या उत्तम अभिनेत्री असल्याचा टोमणा देखील मारला. तर काही जणांनी गांधीजी सोडून सगळेच हसत असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर काही जणांनी हे फक्त राजकारणी असून यांना या घटनेचे कसलेही गांभीर्य नसून फक्त राजकारण करत असल्याचे म्हटले आहे.

अपघातात पीडितेच्या काकूचा आणि मावशीचा मृत्यू 

रविवारी दुपारी पीडिता प्रवास करत असलेल्या कारला झालेल्या अपघातात पीडितेच्या मावशीचा आणि काकूचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर हा अपघात नसून खून केला असल्याचे आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी या आमदारावर केले होते.

त्यानंतर पोलिसांनी या घटनेतील आरोपी आमदार, ट्रक ड्रायवर, क्लिनर आणि त्याचबरोबर त्यांच्या इतर साथीदारांची देखील चौकशी सुरु केली आहे. त्याचबरोबर  गंभीर जखमी झालेली पीडिता हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर असून तिची स्थिती नाजूक असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर वकिलाची देखील प्रकृती नाजूक असल्याचे सांगितले जात आहे.