अमोल कोल्हेंनी किल्ल्यांसाठी काय केलं ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रातील 25 किल्ल्याचं हेरिटेज हॉटेल किंवा विवाह स्थळांमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घातला आहे. या निर्णयावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी संताप व्यक्त करत जे औरंगजेबाला जमलं नाही ते महाराष्ट्र सरकारनं करून दाखवलं अशी टीका केली होती. या टीकेला पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

विरोधी पक्षाकडे मुद्दे नसल्याने गड किल्ल्यांबाबत आता अफवा उठवल्या जात आहेत. कोल्हे यांनी आत्तापर्यंत किल्ल्यांसाठी काय केलं ?, असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच राज्यात किल्ले पडझडीला आले आहेत. आता विरोधकांनी किल्ल्यांवर किती खर्च केला याचे स्पष्टीकरणही त्यांनी कोल्हेंकडे मागितले आहे. पुण्यातील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना रावल यांनी हे विधान केले आहे.

किल्ल्यांच्या दुर्दशेला मागील सरकार जबाबदार –
कोल्हेंवर टीका करताना जयकुमार रावल म्हणाले की, ‘गेली 30 वर्षे किल्ल्यांकडे दुर्लक्ष झाले आहे, याला मागील सरकार जबाबदार आहे. विरोधी पक्षाकडे मुद्दे नसल्याने गड किल्ल्यांबाबत आता अफवा उठवल्या जात आहेत. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आत्तापर्यंत कोणती माहिती घेतली नाही. त्यांना याची पूर्ण माहिती नाही. ते कलाकार आहेत. ते मालिकेत काम करतात. कोणत्या किल्ल्यावर लग्न लागलं किंवा लागणार आहे, हे कोल्हेंनी सांगावे. त्यांनी किल्ल्यांसाठी काय केलं ? गड-किल्ले लग्न समारंभासाठी किंवा हॉटेल व्यवसायासाठी भाड्याने देण्याच्या बातम्या म्हणजे अफवा आहेत. विरोधी पक्षाचा हा डाव आहे.’

काय म्हणाले होते अमोल कोल्हे –
औरंगजेबाला उभ्या हयातीत जमलं नाही ते सरकारने केलं. शिवरायांच्या मावळ्यांनी जिथे रक्त सांडत बलिदान दिलं. अशा 25 किल्ल्यांचे हॉटेल आणि डेस्टिनेशन वेडिंग करण्याचा घाट घातलाय. हे संतापजनक असून आम्ही कदापि हे होऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली होती. ‘शिवसृष्टी नसेल तर शिवचरित्रातला त्या गडाशी संबंधित एखादा प्रसंग उभा राहू शकतो. त्यातून पर्यटनाला वेगळी चालना मिळू शकते. शाश्वत विकासाचा विचार करुन आणि त्याही पलीकडे जाऊन इतिहासाशी प्रामाणिक राहून या गडकिल्ल्यांच्या बाबतीच विचार करावा.’ असे कोल्हे म्हणाले होते.

आरोग्यविषयक वृत्त –