फडणवीसांचा PM मोदींच्या स्किल इंडियावर विश्वास नाही, जयंत पाटलांची टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी फेसबुक लाईव्ह करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलेली आकडेवारी खोटी असल्याचा आरोप केला. फडणवीस यांनी दिलेल्या आकडेवारीला उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या वतीने शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

सरकारच्या मंत्रीमंडळातील कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हटले, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील तरुणांकडं परप्रांतिय मजुरांप्रमाणे कौशल्यं नाही म्हणतात. यातून महाराष्ट्रातील तरुणांना कमी लेखणाऱ्या फडणवीस यांचा पंतप्रधान मोदींच्या स्किल इंडीयावरच विश्वास नसल्याचं दिसतंय, असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे अनिल परब, काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

जयंत पाटील पुढे म्हणाले, फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी महाराष्ट्राच्या प्रश्नांविषयी चिंता व्यक्त करताना कोरोनाशी लढा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठिशी उभे राहतील असे वाटले होते. मात्र, दुर्दैवाने त्यांची भूमिका यापेक्षा वेगळी दिसली. फडणवीस यांनी राज्यातील या सर्व कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नावर पाणी ओतण्याचा प्रयत्न केला. परराज्यातील मजूर बाहेर गेल्याने आपल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल असं वक्तव्य केलं. तसेच राज्यातील लोकांकडे त्या मजुरांसारखे कौशल्य नसल्याचेही म्हटले. यातून त्यांनी महाराष्ट्रातील तरुणांना कमी लेखलं आहे.

मुंबईतील आयएफएससीचं मुख्यालय गुजरातमध्ये हलवण्याच्या निर्णयावर त्यांनी टीका करताना म्हटले, एकिकडे मुंबईसह महाराष्ट्र कोरोनाशी लढा देत असताना दुसरीकडे केंद्रात सत्तेत असलेलं मोदी सरकार आयएफएससीचं मुख्यालय गुजरातमध्ये नेण्याचा निर्णय घेतला. मुंबई अडचणीत असताना मुंबईच्या समांतर गुजरातमध्ये व्यवस्था उभारण्याचं काम गुजरातमध्ये झालं. त्याचं देवेंद्र फडणवीस समर्थन करत आहेत. याचे आम्हाला दु:ख आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

महाराष्ट्रातील आणि विशेषत: मुंबईची परिस्थिती हाताबाहेर गेल्याच्या बातम्या जाणीवपूर्वक विविध माध्यमातून सोडण्यात आल्या आहेत. मात्र, देशातील सर्वात उत्तम काम मुंबईत झाले आहे, हे मी नम्रपणे सांगतो. दोन एप्रिलच्या दरम्यान केंद्र सरकारचं पथक आणि जागतिक आरोग्य संघटनेचे तज्ज्ञ सांगत होते, एप्रिलच्या अखेरपर्य़ंत मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दीड लाखाच्या घरात जाईल. मात्र, त्यावेळी रुग्णांचा आकडा केवळ 10498 एवढा होता. हे मुंबईसह राज्यात राबवलेल्या योजनाबद्ध कामाचं श्रेय असल्याचे जयंत पाटील यांनी सांगतलं.

आम्ही महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या दुप्पट होण्याच्या दरावर सर्वात जास्त नियंत्रण आणलं आहे. सुरुवातीला हा दर 3.8 होता तो आता 14.2 दिवस झाला आहे. आज दहा रुग्ण असेल तर त्याची संख्या वीस होण्यासाठी चौदा दिवसाहून अधिक वेळ लागतो. सुरुवातील एप्रिलच्या मध्यावर कोरोनाचा मृत्यू दर 7.6 होता, तो आज 3.5 इतका आहे. आपला हा दर गुजरापेक्षा चांगला आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.