फडणवीसांनी आत्तापासूनच उठाबशा काढल्या, तर थोडीफार मजल गाठता येईल; राष्ट्रवादीचा भाजपला टोला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विधान परिषद निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. भाजपनंतर आता राष्ट्रवादीने पलटवार केला आहे. मुंबई महापालिकेचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपची किती ताकद आहे हे देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे, त्यांचा पराभव निश्चित आहे. मात्र, आत्तापासूनच उठाबशा काढल्या तर निदान थोडीफार मजल गाठता येईल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

पुणे पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी पुण्यातील काँग्रेस भवन येथे महाविकास आघाडीने बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी मंत्री सतेज पाटील, मंत्री विश्वजित कदम तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवावी की कशी हा निर्णय तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. मात्र, महाविकास आघाडीने मुंबई महापालिकेची निवडणूक लढवावी, अशी आमची इच्छा आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात उद्यापासून महाविकास आघाडीच्या प्रचाराला सुरुवात होत आहे. महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. सर्व पक्षाचे कार्यकर्ते एकत्रित काम करणार आहेत. राज्यातील पाच ठिकाणी महाविकास आघाडीचे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार विजयी होतील. ही निवडणूक आम्ही जिंकू असा विश्वास आहे.
ते म्हणाले, महावितरण कंपनी फडणवीस सरकारच्या काळातच तोट्यात गेली आहे. ६७ हजार कोटी रुपयांची थकबाकी ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच थकली होती, असा आरोप करत त्यांच्याच काळात हा एवढा बोजा का वाढला याची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. वाढीव वीजबिलांच्या संदर्भात कसा तोडगा काढायचा यावर चर्चा सुरू आहे. यातून सरकार लवकरच मार्ग काढेल. असेही त्यांनी सांगितले.

पालकांनी गोंधळून जाऊ नये
राज्यातल्या शाळा सुरू होत आहेत. मुंबईमधील परिस्थिती आटोक्यात राहावी म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला असेल, मात्र राज्यात काही ठिकाणी परिस्थिती वेगळी आहे. तिथले स्थानिक प्रशासन राज्य सरकारला कळवून निर्णय घेणार आहे. त्यामुळे पालकांनी गोंधळून जाऊ नये, असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.