कोणतीही तपास यंत्रणा नि:पक्षपाती नाही : जयंत पाटील

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – देशात हुकूमशाही आणण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे देशातील कोणतीही तपास यंत्रणा निःपक्षपातीपणे तपास करणार नाही, असे खेदाने म्हणावे लागत असल्याचे विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

एका आंतरराष्ट्रीय सायबरतज्ञाने पत्रकार परिषद घेऊन भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केली आहे. मुंडे यांच्या समर्थकांमध्येही मुंडेच्या मृत्यूबद्दल साशंकता होती, ही हत्या असल्याचा संशय आहे. या प्रकरणाची आंतरराष्ट्रीय स्तरावरील यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची गरज आहे. कारण सीबीआयसह अन्य यंत्रणा काही जणांनी खिशात घातल्या आहेत, असा थेट आरोप पाटील यांनी केला.

केंद्र व राज्य शासनाने अनेक खोटी आश्‍वासने दिली. शेतीमाला भाव नाही, त्यामुळे शेतकर्‍यांसह सर्वसामान्य जनता या सरकारला वैतागली आहे. राज्य व देशात परिवर्तनाची लाट आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने रायगड किल्ल्यावरून परिवर्तन यात्रेला प्रारंभ केला आहे. दि.31 जानेवारी व दि.1 फेब्रुवारीला ही यात्रा नगर जिल्ह्यात येणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी  लोकसभा निवडणूक लढविणार आहे. लोकसभेच्या राज्यात 48 जागा आहेत. त्यापैकी 44 जागा वाटपाबाबत निर्णय झाला आहे. चार जागांबाबत निर्णय झालेला नाही. काँग्रेसने काही जागांची मागणी केली तर राष्ट्रवादीनेही काही जागांची मागणी केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष खा. राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार या जागांबाबत अंतिम निर्णय घेतली.

निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या

भाजपा वगळता देशातील सर्वच पक्षांनी निवडणूक आयोगाला भेटून आगामी निवडणूक ईव्हीएम मशिनऐवजी बॅलेट पेपरवर घ्यावी, अशी मागणी केली आहे. देशातील लोकांना ईव्हीएम मशीनवर शंका असेल, तर निवडणूक आयोगानेही त्यांची भूमिका बदलली पाहिजे, असेही पाटील म्हणाले.

मनसेसोबत आघाडीचा विचार नाही

मनसेबरोबर आघाडी करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. राज ठाकरे यांच्या मुलाचे लग्न असल्याने ते लग्नसमारंभाच्या पत्रिका देण्यासाठी भेटतात. त्यांनी भेटी घेतल्या म्हणजे त्या राजकीय आहेत, असे म्हणता येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले.

नीलेश लंके राष्ट्रवादीत

शिवसेनेचे पारनेर माजी तालुकाध्यक्ष नीलेश लंके हेही पत्रकार परिषदेला उपस्थित होते. परिवर्तन मेळाव्यात पारनेर येथे होणार्‍या जाहीर सभेत 50 हजार कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या परिवर्तन मेळाव्यात पारनेर येथे निलेश लंके यांच्याकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.