पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Jayant Patil On Vasant More | राज्यात इतर निवडणुकांपेक्षा यंदाची विधानसभा निवडणूक राजकीयदृष्ट्या वेगळी ठरली आहे. दोन प्रमुख पक्षांमध्ये उभी फूट पडल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीत काय होईल? याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे. सर्वपक्षीयांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी पक्षांतर केल्याची उदाहरणे आहेत.
मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीत गेले, तिथून लोकसभेत पराभव झाल्यानंतर मोरे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मात्र हडपसर, खडकवासला या दोन्ही जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी पवार गटाला गेल्याने वसंत मोरे मविआ उमेदवारांचा प्रचार करत आहेत.
दरम्यान हडपसर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सभा होती. या सभेत उद्धव ठाकरे गटाचे वसंत मोरे हे देखील उपस्थित होते. यावेळी जयंत पाटलांनी सभेत बोलताना वसंत मोरे यांच्या हातात आम्ही कधीही तुतारी देऊ,असे एक विधान केले. या विधानानं पुन्हा एकदा वसंत मोरे पक्ष बदलणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
जयंत पाटील म्हणाले, ” आमचं घड्याळ चोरीला गेलंय, जेव्हापासून तुतारी हाती आली तेव्हापासून तुतारी महाराष्ट्रभर घुमतेय. तुतारी चिन्हावर उभे राहिले तर निवडून येते असं सगळ्यांच्या लक्षात येते. आज व्यासपीठावर सर्वपक्षीय नेते आहेत, वसंत मोरे इथं बसलेत, तुमच्या हाती मशाल आहे.
आम्ही तुमच्या हातात तुतारी कधीही देऊ शकतो. माझे ते आवडते नेते आहे, त्यांचे काहीही विधान आले तरी मी बघत असतो. लोकसभेलाही माझे त्यांच्यावर फार लक्ष होते, असं विनोदी शैलीत जयंत पाटील यांनी भाष्य केले.
जयंत पाटील यांच्या विधानावर बोलताना वसंत मोरे म्हणाले, ” जयंत पाटलांच्या आधी माझं भाषण झाले, त्यात मी सांगितले, अवघ्या काही महिन्यात पुणे महापालिकेची निवडणूक आहे. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर बसलो होतो. आत्ताच्या घडीला आम्ही हातात मशाल घेऊन तुतारी वाजवायला तयार आहोत परंतु अशाप्रकारे हातात मशाल, तुतारी महापालिका निवडणुकीपर्यंत एकत्र राहिली पाहिजे याची खबरदारी आपण घ्या.
हे मी बोलल्यानंतर जयंत पाटील यांनी हास्यास्पदरित्या तसं बोलले. आम्ही हातात मशाल घेऊन तुतारी वाजवायची तयारी केलीय. उद्धव ठाकरे, संजय राऊतांच्या आदेशानंतर मी हडपसर, खडकवासला मतदारसंघात चांगले काम करतोय”, असे वसंत मोरे यांनी सांगितले.