जयंत पाटील यांनी केली नाना पटोलेंची पाठराखण, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे आमच्यामुळे आहे, आम्ही सरकारमुळे नाही, असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका मुलाखतीत केला होता. त्यानंतर आता यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांसह राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. आता राष्ट्रवादीचे नेते व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपल मत व्यक्त केले आहे. पाटील यांनी पटोलेंची पाठराखण केल्याचे त्यांच्या प्रतिक्रियेवरून दिसून येत आहे. पाटील म्हणाले की, त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्याचा प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांना अधिकार आहे. आमच्या तिन्ही पक्षात अशा कोणत्याही विधानाने गैरसमज होत नाहीत. त्यामुळे त्यांचे म्हणण बरोबर आहे. त्याच काही चुकीच आहे, असे मला वाटत नाही. त्यामुळे त्यावर फार काही बोलण्याची आवश्यकता नाही, असे पाटील यांनी म्हटले आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसचे स्थान यावर बोलताना नाना पटोले यांनी काँग्रेसची भूमिका मांडली आहे. आम्ही यापूर्वी अनेकदा सांगितले आहे की, हे सरकार आमच्यामुळे आहे, आम्ही सरकारमुळे नाही. आमच्या नेत्यांनीही तेच सांगितले आहे. आमची सरकारमध्ये खूप सारी भागीदारी नाही. पण सगळ्यांचा समान विकास व्हायला हवा. उद्धवजी किंवा अजित पवार यांच्यासोबत किमान समान कार्यक्रमाच्या आधारावरच आमचे नात जोडले गेल्याचे ते म्हणाले. यावर शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, काँग्रेसशिवाय सरकार आहे अशी शंका पटोले यांना का यावी. हे सरकार बनवताना आम्ही आघाडीवर होतो. राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्याशी सुरुवातीपासूनच आमच्या चर्चा सुरु होत्या. शरद पवार, उद्धव किंवा अन्य नेते असतील. त्यामुळे हे सरकार एकमेकांच्या मदतीने अन् सहकार्यानेच चालले आहे. याचे विस्मरण तिन्ही पक्षातील कोणालाही झाले नाही, असे म्हटले आहे.