जळगाव : महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन, भाजपचे तब्बल 27 नगरसेवक ‘फुटले’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – जळगाव महापालिकेमध्ये सांगली पॅटर्न राबवत अखेर शिवसेनेनं भाजपला सत्तेपासून दूर केले आहे. भाजपला सत्तेवरुन खाली खेचत शिवसेनेने पालिकेवर भगवा फडकवला आहे. शिवसेनेच्या महापौरपदाच्या आणि उपमहापौरपदाच्या उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली. शिवसेनेने तब्बल 45 मतं मिळवली आहेत. त्यामुळे महापालिकेवर भगवा फडकला आहे.

आज झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री महाजन यांनी भाजपच्या प्रतिभा कापसे यांचा 15 मतांनी पराभव करत महापौरपदी विराजमान झाल्या. जयश्री महाजन यांना 45 तर प्रतिभा कापसे यांना 30 मते मिळाली. भाजपचे 27 नगरसेवक फुटल्याने व एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी देखील शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्याने सेनेने बहुमताचा 38 चा आकडा पार करत अधिक मते मिळवली.

आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सभेत महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक घेण्यात आली. यात प्रारंभी ॲड. शुचिता हाड यांनी उमेदवारीबाबत आक्षेप घेतला. त्यांनी जयश्री महाजन यांच्या अर्जात त्रुटी असून कुलभूषण पाटील यांच्या अर्जावर सूचक नसल्याचा दावा केला. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी हे आक्षेप फेटाळून लावले. यावरुन सभागृहात वाद झाला. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया पार पडली.

जळगाव महापालिकेत भाजप व शिवसेना-भाजप बंडखोर अशी लढत होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ऑनलाईन सभा होत आहेत. सेना व भाजप बंडखोर हे ठाण्यात असून पत्रकारांना सभेत येण्यास मनाई करण्यात आली होती.

दरम्यान, शिवसेनेच्या तंबूत गेलेल्या फुटीर नगरसेवकांना व्हीप न बजावता आल्याने भाजपने कोर्टात याचिका दाखल केली आणि महासभा ऑनलाईन नाही तर ऑफलाईन घेतली तर व्हीप बजावता येईल अशी भूमिका मांडली. मात्र औरंगाबाद खंडपीठाने भाजपची याचिका फेटाळून लावल्याने, भाजपच्या अडचणीत वाढ झाली होती. अखेर शिवसेनेने करुन दाखवत जळगाव महापालिकेवर भगवा फडकवला आहे.