राष्ट्रवादीला मोठा धक्‍का : ज्येष्ठ नेते जयदत्‍त क्षीरसागर आज शिवसेनेत प्रवेश करणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जयदत्‍त क्षीरसागर हे आज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मातोश्रीवर शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडून क्षीरसागर शिवबंधन बांधतील. गेल्या अनेक दिवसांपासुन जयदत्‍त क्षीरसागर हे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर नाराज होते. त्यांनी त्यांची नाराजी जाहिरपणे देखील बोलुन दाखविली होती. एवढेच नव्हे क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विरोधात भुमिका घेतली होती. क्षीरसागर यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्‍का बसणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ते आपण पक्ष सोडणार असल्याचे सांगत होते, मात्र ते शिवसेनेत प्रवेश करणार कि भाजपमध्ये हे नक्की नव्हते. मात्र आज ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यात काय  करायला हवे याविषयी कार्यकर्त्यांची मते विचारात घेतली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे  नेते  धनंजय मुंढे यांच्यावर सडकून टीका केली होती. ‘मागच्या दरातून आलेले, घर फोडणारे, गुंडगिरी करणारे यांना धडा शिकवा,’ असं म्हणत धनंजय मुंडेंवर निशाणा साधण्यात आला होता. त्यामुळे मागील महिन्यातच त्यांनी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे नक्की केल्याचे बोलले जात होते. आज अखेर ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्याचबरोबर ‘भाजपला मदत करून विजयाची गुढी उभारा. डॉ. प्रीतम मुंडे यांना मतदान करा,’ असं जाहीर आवाहन आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं होतं.

कोण आहेत जयदत्‍त क्षीरसागर

जयदत्‍त क्षीरसागर हे दिवंगत खा. केशरकाकु क्षीरसागर यांचे पुत्र आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासुन जयदत्‍त क्षीरसागर हे शरद पवारांच्या सोबत आहेत. क्षीरसागर यांना आघाडी सरकारच्या काळात मंत्रीपद देखील बहाल करण्यात आले होते. धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यापुर्वी बीड आणि परिसरातील राष्ट्रवादीची सर्व सुत्रे जयदत्‍त क्षीरसागर यांच्याकडून हलत होती. धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यापासुन क्षीरसागर हे शरद पवार आणि अजित पवारांपासुन काहीसे दूर गेले. अजित पवार यांनी जयदत्‍त क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यावर बीड राष्ट्रवादीची जबाबदारी सोपविली. त्यामुळे जयदत्‍त क्षीरसागर आणखी नाराज झाले.