‘राष्ट्रवादी’चा ‘हा’ मोठा नेता आज ‘शिवसेने’त करणार प्रवेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकांचा एक्झिट पोल भाजपच्या बाजूने दिसत आहेत. एकीकडे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण असताना महाराष्ट्रात विधानसभेची तयारी म्हणून अनेक नेत्यांनी पक्षबदल करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील अनेक मोठ्या नेत्यांच्या पक्ष बदलण्याचा बातम्या सतत कानावर येत असताना आता बीडमधील राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आज मातोश्रीवर शिवबंधनात अडकणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून ते मातोश्रीवर शिवबंधन बांधतील.

राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर आज शिवसेनेत करणार प्रवेश

गेल्या अनेक दिवसांपासून ते आपण पक्ष सोडणार असल्याचे सांगत होते, मात्र ते शिवसेनेत प्रवेश करणार कि भाजपमध्ये हे नक्की नव्हते. मात्र आज ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यात काय करायला हवे याविषयी कार्यकर्त्यांची मते विचारात घेतली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंढे यांच्यावर सडकून टीका केली होती. ‘मागच्या दरातून आलेले, घर फोडणारे, गुंडगिरी करणारे यांना धडा शिकवा,’ असं म्हणत धनंजय मुंडेंवर निशाणा साधण्यात आला होता.

त्यामुळे मागील महिन्यातच त्यांनी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे नक्की केल्याचे बोलले जात होते. आज अखेर ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्याचबरोबर ‘भाजपला मदत करून विजयाची गुढी उभारा. डॉ. प्रीतम मुंडे यांना मतदान करा,’ असं जाहीर आवाहन आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं होतं.

कोण आहेत जयदत्त क्षीरसागर

जयदत्त क्षीरसागर १९९० पासून आजपर्यंत विधानसभेवर निवडून गेले आहेत. प्रथम काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादीकडून ते विधानसभेवर निवडून जात होते. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी अनेक मंत्रिपदं देखील सांभाळली आहेत.