राष्ट्रवादीला मोठा धक्का ; बीडचे आ. क्षीरसागर आणि त्यांचे बंधू ‘मातोश्री’ वर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून पक्ष वाढविण्यासाठी गेली १५ वर्ष बीडमध्ये अविरत काम करणारे माजी कॅबिनेट मंत्री राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर नाराजी व्यक्त केली असून त्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी उद्धव ठाकरेंना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांनाही भेटले.

क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी पक्षाविरोधात भूमिका जाहीर केली असून बीडच्या भाजप उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांना साथ देण्याचं आवाहन हजारो कार्यकर्त्यांना केलं. सध्या राष्ट्रवादीत काय सुरू आहे माहीत नाही. पक्ष कोण चालवतोय माहीत नाही. मला पक्षाने मजबूर केलंय. पण मी मजबूर नाही, तर मजबूत आहे, असं जयदत्त क्षीरसागर म्हणाले.

प्रितम मुंडेंच्या विजयाची गुढी उभारणार

भाजप सरकारच्या काळात बीड जिल्ह्यासाठी भरघोस निधी आलाय. आमची साथ कायम विकासाला होती. त्यामुळे या निवडणुकीत भाजपच्या बीडच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांना मदत करुन विजयाची गुढी उभारु, अशी फेसबुक पोस्ट सुद्धा त्यांनी केली असून १८ तारखे नंतर पुढील निर्णय जाहीर करणार असल्याचंही ते म्हणाले. मेळाव्याला अल्पसंख्याक, मुस्लिम, मराठा आणि ओबीसी समाजातील जिल्हा भरातील कार्यकर्ते उपस्थित होते. मुंडेंना निर्णायक मतदानाने निवडून आणण्याचा संकल्प आ. जयदत्त क्षीरसागर यांनी केला.