home page top 1

राष्ट्रवादीचे आमदार भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी व्यासपीठावर

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे भाजपाच्या व्यासपीठावर दिसले आहेत. या निवडणुकीत त्यांनी भाजपाला पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते त्यानुसार, जयदत्त क्षीरसागर यांनी भाजपाच्या बीडच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांच्यासाठी प्रचारदेखील सुरू केला आहे. प्रितम मुंडे यांची शिरूर तालुक्यातील खालापुरी येते सभा पार पडली. या सभेसाठी जयदत्त क्षीरसागर यांनी हजेरी लावली. यावेळी सभेत बोलताना त्यांनी प्रितम मुंडे यांना मतदान करण्याचं आवाहनही केलं. तर दुसरीकडे बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनीदेखील त्याचे बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत टीका केली.

‘ज्या दिव्याला मी वादळापासूनव वाचवलं त्यानेच मला चटके दिले’
यावेळी बोलताना आमदार जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, “जे चित्र आज दिसत आहे तसं चित्र यापूर्वीच्या निवडणुकीत कधीच दिसलं नाही. राजकारणात मी जात, पात, धर्म कधीच पाहिला नाही. सर्वसामान्य लोकांना आपल्या पोटाचं पडलेलं असतं. रोजची चूल कशी पेटणार ? मुलांचं शिक्षण कसं होणार ? याची चिंता त्यांना लागलेली असते. गेल्या तीन वर्षापासून मी अस्वस्थ होतो. ज्या दिव्याला मी वादळापासून रोखण्याचा प्रयत्न केला, त्याच दिव्याने मला चटके दिले. त्यामुळे आता तो विझलाच पाहिजे.” असा टोला क्षीरसागर यांनी लगावला.

‘त्या लोकांना जिल्ह्याने निवडून दिले तेव्हा कधी जातीवाद झाला का ?’
पुढे बोलताना क्षीरसागर म्हणाले की, “मोदींचे हात बळकट करण्यासाठी आम्ही डॉ. प्रितम मुंडे यांना निवडून देण्याचा निर्णय घेतला. बीड जिल्ह्यात यापूर्वी कधीही जातीवाद झाला नाही. रखमाजी गायकवाड, काँ. गंगाधर बुरांडे, केशरकाकु क्षीरसागर, बबनराव ढाकणे यांच्या सारख्या लोकांना जिल्ह्याने निवडून दिले. तेव्हा कधी जातीवाद झाला का ? मतदान हे विकासाला मिळत असतं, जातीपातीच्या नावाने मतदान मागणे हा खऱ्या अर्थाने आचारसंहितेचा भंग आहे.” असे ते म्हणाले.

‘उद्याच्या निवडणुकीत प्रितम मुंडे यांना प्रचंड मताने निवडून द्या’
आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना आणि प्रितम मुंडेंना निवडून देण्याचं आवाहन करताना क्षीरसागर म्हणाले की, “50 वर्ष देशात आणि राज्यात सत्ता भोगणाऱ्या लोकांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. मात्र देवेंद्र फडणवीस सरकारने हा प्रश्न मार्गी लावून इतिहास घडवला. मोदींनी 10 टक्के आरक्षण हे सवर्ण लोकांना देऊन प्रगतीच्या वाटेवर आणण्याचं काम केलं. या मतदारसंघात रक्ताच्या नात्यापेक्षा आम्ही विकासाच्या नात्याने लोकांची मनं जोडली आहेत. परंतु काही लोक हे निवडणुका आल्यानंतर मात्र सुपाऱ्या घेऊन तुताऱ्या वाजवताना दिसतात. अशा लोकांना बुक्का लावून त्यांची जागा दाखवा आणि उद्याच्या निवडणुकीत प्रितम मुंडे यांना प्रचंड मताने निवडून द्या.” असं आवाहनही क्षीरसागर यांनी यावेळी केलं.

‘आगे आगे देखो होता है क्या’ : पंकजा मुंडे
दरम्यान यावेळी पंकजा मुंडे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. पंकजा म्हणाल्या की, “ज्यांचं आयुष्य दोन्ही काँग्रेस पक्षात गेलं ते आता विकासाच्या मुद्द्यावर आमच्यासोबत आले आहेत. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी ते मोदी लाटेत येऊन मिसळले आहेत. आण्णा आले, आगे आगे देखो होता है क्या” असे म्हणत पंकजा यांनी सूचक इशारा दिला.

‘मित्रालाही धोका देणारे धनंजय मुंडे धोकेबाज…’ : पंकजा मुंडे
पुढे बोलताना पंकजा म्हणाल्या की, “घरं फोडणारे आम्ही नाहीत. ज्या वेदना गोपीनाथराव मुंडे यांना झाल्या त्या दुसऱ्याला होऊ नये या मताची मी आहे. मित्रालाही धोका देणारे धनंजय मुंडे धोकेबाजाची ऑलिम्पिक स्पर्धा जिंकल्याशिवाय राहणार नाहीत.” अशी घणाघाती टीका पंकजा यांनी केली.

Loading...
You might also like