एकनाथ खडसेंचा पुन्हा ‘हल्ला’, म्हणाले – ‘भाजपाच्या आजच्या नेतृत्वामध्ये मत्सर अन् व्देषभावना’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा राज्यातील भाजपाच्या नेतृत्वावर टीका करून भाजपला घरचा आहेर दिला आहे. राज्यातील भाजपाच्या आजच्या नेतृत्वामध्ये मत्सर अन् द्वेषभावना असल्याचे ते म्हणाले आहेत. गोपीनाथ गड येथे होणाऱ्या मेळाव्या आधी ते बोलत होते.

फडणवीस यांच्यावर टीका करताना एकनाथ खडसे म्हणाले की, ‘भाजपाच्या आजच्या नेतृत्वामध्ये मत्सर अन् द्वेषभावना आहे. निवडणुकीत तिकीट दिले नाही, त्यामागे राजकारण होते. रोहिनी खडसे तिकीट मागत नव्हत्या, तरीही दिले. अपमानास्पद वागून दिली जाते, हा विश्वासघात आहे. आधी असे राजकारणात होत नव्हते. गोपीनाथ मुंडे असते तर ही आली वेळ नसती. ते पाठीत खंजीर खुपसणारे नव्हते. पंकजा, रोहिणीच्या पराभवामागे षडयंत्र होते भाजपाच्या नेतृत्व कोत्या मनाचं आहे.’

गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी सांगताना एकनाथ खडसे म्हणाले की, ‘गोपीनाथ मुंडे असताना आम्ही नेहमी हसत-खेळत राजकारण केले. त्यांच्या संघर्षामुळे भाजपाला सध्या चांगले दिवस आले. गोपीनाथ मुंडे कार्यकर्त्यांचे आधार होते.’

खडसे भाजपमध्ये नाराज असून वेळोवेळी त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. मागील 4 वर्षांपासून भाजपमध्ये नाराज असलेले एकनाथ खडसे पक्षात बंड करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भाजपमधील नाराज नेत्यांच्या बैठकीचं सत्रही सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. खडसे हे भाजप नेत्यांच्या भेटीसाठी दिल्लीत गेल्याची चर्चा होती. पण, त्याऐवजी ते शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले. पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातील लोकांमुळेच झाला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/