JEE मुख्य परीक्षा पुढे ढकलली, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता JEE मेन्सची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन JEE मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याची माहिती दिली. नॅशनल टेस्टिग एजंसी (NTA) ने 18 एप्रिल रोजी JEE मुख्य परिक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केली होती. ही परीक्षा मे महिन्यात होणार होती. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

JEE मुख्य परीक्षा 27, 28 आणि 30 एप्रिल रोजी घेण्यात येणार होती. मात्र देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नॅशनल टेस्टिग एजंसीने 18 एप्रिल रोजी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे घोषीत केले होते. त्यानंतर ही परीक्षा 24 ते 27 मे या कालावधीत घेण्याची घोषणा करण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी एनटीएच्या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

देशभरातील जवळपास 6 लाख विद्यार्थी इंजिनिअरिंग प्रवेशासाठी या परीक्षेला बसणार होते. मार्चच्या अटेम्पटमध्ये परीक्षा 6,19,638 विद्यार्थी सहभागी झाले होते. तर फेब्रुवारीच्या अटेम्पटमध्ये 6.52 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केला होता.