जीप टँकरचा समोरासमोर अपघात, दोन ठार तर पाच जखमी

औसा : पोलीसनामा ऑनलाईन – भरधाव वेगात जाणाऱ्या जीप आणि टँकरची समोरासमोर धडक होऊन दोन जणांचा मृत्यू झाला तर पाचजण गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात आज (बुधवार) सायंकाळी रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर औसा व तुळजापूर दरम्यान असलेल्या बेलकुंड आणि टाका पाटी दरम्यान झाला.

विवेक शिर्के व अरुण कायंदे असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे असून जखमींची नावे समजू शकली नाहीत. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना औसा आणि लातूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारसाठी दाखल केले. तर मृत व्यक्तींचे मृतदेह बेलकुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या अपघाताची माहिती जखमी व्यक्तींच्या नातेवाईकांना देण्यात आली असून ते आल्यानंतर पुढील निर्णय घेणार असल्याचे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, दिलीप बिल्डकाँनच्या कामावर आसलेला टँकर (, एम पी ३९ – १८६३) उजनी कडून बेलकुंडकडे येत होता, तर जीप (एम एच २४ सी ६४५७) औशाकडून उजनीकडे जात होती. या दोन वाहनांमध्ये समोरा-समोर धडक झाली. यामध्ये जीपमध्ये आसलेले विवेक शिर्के व अरुण कायंदे हे दोघे जागीच ठार झाले. हे दोघे सातारा जिल्ह्यातील शेंद्री येथील असून सध्या मुंबईत राहत असल्याचे समजते.