जेजुरी आरोग्य सेवा संघाचा उपक्रम : 130 गरजू रुग्णांना मधुमेह, उच्चरक्तदाबाच्या औषधांचे वाटप
जेजुरी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन झाल्या नंतर सर्वसामन्य माणसांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गरीब,वृध्द ,आजारी रुग्णांना औषधे विकत घेणे अशक्य झाले आहे . अशा व्यक्तींना आधार देण्यासाठी जेजुरी शहरात जेजुरी आरोग्य सेवा संघाच्या वतीने एकशे तीस गरजू रुग्णांना एक महिन्यांची औषधे देण्यात आली.
देशात डायबेटीस आणि ब्लडप्रेशरचे असंख्य रुग्ण आहेत. त्यांना त्यांच्या आरोग्यासाठी नियमित औषधे घेणे आवश्यक आहे. देशात लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर अनेकांचे रोजगार गेले. दैनंदिन अडचणी वाढत गेल्या ,अनेक वृध्द,गरीब,रुग्णांना याकाळात औषधे विकत घेणे हि अश्यक्य झाले आहे. त्यामुळे मधुमेही ,व उच्चरक्तदाब रुग्ण यांची मोठी कुचंबना सुरु झाली आहे. जेजुरी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि डॉ नितीन केंजळे,व डॉ शमा केंजळे यांच्या क्लिनिक मध्ये अशा रुग्णांची माहिती मिळाली.डॉ.केंजळे,सामाजिक कार्यकर्ते प्रकाश खाडे यांनी पुढाकार घेवून गरजू रुग्णांना मोफत औषधे मिळवून देण्यासाठी जेजुरी आरोग्य सेवा संघाची स्थापना करून गरजू रुग्ण शोधून काढले.
सोमवार दि ४ रोजी जेजुरी येथील ऐतिहासिक छत्री मंदिर परिसरात सोशल डीस्टटिंग ठेवून सुमारे १३० गरजू रुग्णांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.यावेळी जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने,उपनिरीक्षक विजय वाघमारे, जेजुरी उद्योजक संघाचे कार्याध्यक्ष रवींद्र जोशी,उपाध्यक्ष पांडुरंग सोनवणे,माजी उपनगराध्यक्ष सुधीर गोडसे, राजेंद्र पेशवे,भाजपचे सचिन पेशवे,प्रसाद अत्रे, विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेद्र चौधरी, गणेश आबनावे, पुरंदर मेडिकल चे अनुप राउत, बाळासाहेब लेंडे ,आयुब खान आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
डायबेटीस व उच्चरक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी लॉकडाऊन आणि पुढच्या काळात हि बाहेर जावू नये, यापुढे हि संघाच्या वतीने औषधे उपलब्ध करून देण्यात येतील असे डॉ नितीन केंजळे यांनी सांगितले. संघाच्या वतीने हा उप्रकम सुरु करताच अनेक देणगीदार औषधांची मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम सुरु केल्याचे प्रकाश खाडे यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे नियोजन डॉ शमा केंजळे,पुष्कर खाडे, रेणुका थोरात,अनुप राउत चैतन्य खाडे ,स्वप्नील बडदे, राजेश शेरे आदींनी केले आहे .