जेजुरी पालिकेने चालू व पुढील वर्षाची चतुर्थ कर आकारणी रद्द करावी : भाजपाची मागणी

जेजुरी : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊन मुळे गेली तीन महिन्यांपासून जेजुरी शहर बंद असून त्यामुळे खंडोबा देवाच्या भाविकांवर अवलंबून असणारी जेजुरीकर नागरिकांची अर्थव्यवस्था ढासळली आहे.पुढील काही महिने मंदिर सुरु होण्याची शक्यता कमी असून जेजुरीकर नागरिकांची अर्थव्यवस्था सुधारणे कठीण दिसत आहे. याचा विचार करून चालू वर्षाची व पुढील वर्षाची ( २०१९ -२० व २०२० – २१ ची )वाढीव चतुर्थ कर आकारणी रद्द करावी अशी मागणी जेजुरी शहर भाजपच्या वतीने केली असल्याचे शहर भाजपा अध्यक्ष सचिन पेशवे यांनी सांगितले.

कोरोनाच्या संकटामुळे १७ मार्च रोजी महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचे खंडोबा मंदिर बंद करण्यात आले. त्यादिवसापासून ते आज पर्यंत जेजुरी शहर बंद असून भाविकांच्या अनुषंगाने होणारा व्यवसाय,व्यापार ,तसेच सेवा बंद आहेत. हजारो नागरिकांचा रोजगार गेला आहे. सर्वसामन्य लोकांची उपासमार होत आहे. व्यवसाय बंद असल्याने रोजी रोटीचा प्रश्न उभा राहिला आहे,कुटुंबांची अर्थव्यवस्था ढासळली आहे.गेली तीन महिन्यांपासून एकही भाविक जेजुरीला येत नाही आणि पुढील आणखी काही महिने भाविक येथे येण्याची शक्यता नाही. त्यामुळे येथील नागरिकांची अर्थव्यवस्था सुधारणे कठीण आहे. त्यामुळे याबाबींचा विचार करून यावर्षी आणि पुढील वर्षाची कर आकारणी रद्द करावी अशा मागणीचे निवेदन जेजुरी पालिकेच्या मुख्याधिकारी पूनम कदम यांच्याकडे भाजपच्या वतीने देण्यात आले आहे. हे निवेदन जिल्हाधिकारी यांना हि पाठविण्यात आल्याचे पेशवे यांनी सांगितले.

यावेळी जेजुरी शहर भाजपचे अध्यक्ष सचिन पेशवे, तालुका भाजपा महिलाध्यक्षा अलका शिंदे, पदाधिकारी गणेश भोसले, नागनाथ झगडे, राजेंद्र कुदळे, तुकाराम यादव आदी उपस्थित होते.
Attachments area