पुरंदर मधील वनपुरीत पुन्हा बैलगाडा शर्यत भरवल्या प्रकरणी पोलिसांची कारवाई

जेजुरी (संदीप झगडे) : पुरंदर तालुक्यातील वनपुरी येथे बैलगाडा शर्यत भरवल्या व गर्दी करून कोरोना आजार पसरवण्यात मदत केली या प्रकरणी सासवड पोलिसांनी कारवाई केली आहे. सासवड पोलिसांनी याप्रकरणी १४ जणांवर प्राण्यांना निर्दयपणे वागवले बाबत गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यात घडलेली ही महिनाभरतील तिसरी घटना आहे. न्यायालयाचा बंदी हुकूम असतानासुद्धा वनपुरी गावत अशा शर्यती कोणाच्या क्रुपाशिर्वादाने आयोजीत केल्या जातात अशी चर्चा दबक्या आवाजात तालुक्यात चर्चली जात आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवार दि. ३०-१०-२०२० रोजी सकाळी १०-३० च्या सुमारास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई अंकुश उगले कर्तव्यावर असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दालनात बोलवून वनपुरी – कुभारवळण गावांच्या साम वर वनपुरी गावच्या हद्दीत बैलगाडा शर्यतीचे आयोजन केलेले आहे. यापुर्वीही याच ठिकाणी त्याच आयोजकांनी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते.अशी माहिती मिळताच पोलीस निरिक्षक डि.एस. हाके, सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे, माने व हवालदार भरत अराडे, पो.शि कानतोडे, चालक दाणे, होमगार्ड पप्पू पोमण व उगले स्वत: वनपूरीच्या दिशेने निघाले असता, सासवडच्या दिशेना पिकप वहान क्र. एम.एच. ११ – टी- ५७८२ मध्ये बैलजोडी दिसल्याने त्या वाहनास थांबून सतीश जगदीश कांबळे रा.रहिमतपूर ता.कोरेगाव, जि. सातारा यांच्या कडे चौकशी केली टेंपो भाड्याने देऊन संग्राम बनकर रा.कोरेगाव याचे बैलजोड व गाडा तसेच इतर दोघे असे वनपुरी येथे बैलगाडा शर्यतीसाठी आल्याचे सांगितले. पुढे प्रवासा दरम्यान एक थार जिप क्र. एम. एच. १२- एन -७ यागाडीत व मोटारसायकल वर काही लोक गुलालाने माखलेले सासवडकडे जाताना दिसले. पथकाने त्यांना थांबवताना विचारपूस केली असता, वनपुरी येथे बैलगाडा शर्यतीसाठी गेल्याची कबुली देत बैलगाडा शर्यत जिंकल्याचे त्यांचे त्यांनी सांगितले.

सासवड पोलीस स्टेशन मध्ये आल्यानंतर आयोजकांनी ५-६ बैलगाडा – जोड्यांनी सहभाग घेतल्याचे व शर्यतीच्या ठिकाणी गर्दी झाल्याची कबुली दिली. पुरंदर तालुक्यातील वनपुरी गावच्या हद्दीमध्ये सकाळी ७-३० ते १०-३० च्या दरम्यान गट नंबर २४८ मध्ये १) मच्छिंद्र उर्फ बाबा हरिश्चंद्र जगताप रा. ताथेवाडी, २) चंद्रकांत प्रकाश शिंदे रा. ताथेवाडी, ३) शुभम राजेंद्र जगताप रा. तरटेमळा सासवड, ४) सुनील तानाजी कुंभारकर रा. वनपुरी (सर्वजन पुरंदर तालुक्यातील आहेत) यांनी विनापरवाना बैलगाड्यांच्या शर्यतीचे आयोजन करुन शर्यतीच्या निर्बंधांबाबत आदेशाचे उल्लंघन केले.‌ शर्यतीत सहभागासाठी प्रत्येकी १ हजार रुपये भाडे स्विकारत शर्यतीचे खुलेआम आयोजन केले. बैलजोडी मालक १) शिवराम बाळासाहेब जांभोरे रा. होळकरवाडी ता. हवेली, २) संग्राम अनिल बनकर वय रा.कोरेगाव जि. सातारा यांनी पैजेवर बैलगाडा शर्यत लावून जिंकणाऱ्याने हरणाऱ्याकडून ठरल्याप्रमाणे पैसे स्विकारले आहेत. यातील आयोजक, शर्यतीत भाग घेणारे बैलगाडा मालक व त्यांचे सहकारी नावे १) सतीश जगदीश कांबळे, २) प्रविण उर्फ बुवा हरिश्चंद्र जाधव, ३) विशाल हनुमंत भोसले, ४) अरविंद धनवडे, ५) समीर वाडकर, ६) अरविंद वाडकर, ७) निखिल खैरे, ८) तुषार धनवडे या सर्वांना बैलगाडा शर्यतीस बंदी असल्याचे माहिती असूनही, बैलांना शर्यतीसाठी पळवून त्यांना क्रूरतेने वागणूक दिली. तसेच या शर्यत आयोजनामुळे शेकडोंच्या संख्येने बघ्यांची गर्दी जमून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे सामाजिक आंतर पाळण्याचे शासनाने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन केले आहे. कोरोना पसरविण्यासाठी साठी मदत केल्याचे म्हणत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर याबाबतचे व्हिडिओ सुद्धा पोलिसांना उपलब्ध झालेले आहे.

याप्रकरणी सासवड पोलिसांनी आयोजकांन विरुद्ध भा.दं.वि कलम १८८/२६९ प्राण्यांना निर्दयपणे वागवले प्रतिबंधक कायदा कलम ११ सह मुंबई जुगार अधिनियम १२ अ प्रमाणे फिर्याद सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई अंकुश उगले यांनी फिर्याद दाखल केली आहे. गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया शुक्रवारी रात्री उशिरा सुरू आहे. तर या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक डी. एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार चिखले करत आहेत.