जेजुरीत भाजपच्या वतीने घंटानाद आंदोलन

जेजुरी : राज्यभरात मंदिर उघडण्यासाठी आज घंटानाद आंदोलन पार पडतंय. महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरीत सुद्धा आज भाजपाच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. जेजुरीच्या आंदोलनात देवसंस्थानचे विश्वस्त, पुजारी वर्ग सुद्धा सामील होतील अशी चर्चा होती. मात्र यावेळी अपवाद वगळता जेजुरीतील संघटना, देवसंस्थानचे विश्वस्त, पुजारी वर्ग आणि इतर घटकांनी मात्र या आंदोलनाकडे पाठ फिरवली. देवसंस्थानच्या विश्वस्तांनी दोनच दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना मंदिर चालू करण्याची मागणी आम्ही शासनाकडे करत असल्याचे सांगितले होते.

कोरोनाच्या महामारीत राज्य सरकार मद्य विक्री मॉल, बाजारपेठा ही मुख्यतः गर्दिची ठिकाणे खुली करण्यास परवानगी देतंय. मग मंदिरच बंद का.? असा सवाल यावेळी आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे. मागील पाच महिन्यांपूर्वी मंदिर बंद करण्यात आली. मंदिरातील येणाऱ्या भाविकांना मंदिरात येण्यापासून रोखण्यात आले. ऐन लग्नसराई, सणासुदीच्या काळात मंदिरे बंद आहेत. लोकांना धार्मिक विधी करायच्या असतात. या विधी व कर्यक्रमांमुळे जेजुरीच्या अर्थव्यवस्था चालत असते. पुजारी, सेवेकरी, हार, भंडार व इतर पुजा साहित्य विक्रिवर कितेकांची उपजीविका आहे. या सर्वांची उपासमार होत आहे. त्यांना आर्थिक पॅकेजही दिले जात नाही. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र शासनाकडे देवालयात भाविकांना परवानगी द्या अशी मागणी केली आहे. मात्र शासन हिंदू सणांवर निर्बंध कसे घातले जातील या दृष्टिकोनातून प्रयत्न करतंय, सरकार निद्रिस्त अवस्थेत गेले काही दिवस काम करतंय, या सरकारला हिंदू भाविकांच्या भावना लक्षात याव्यात तसेच सरकारला जागे करण्यासाठी आज महाराष्ट्रात जागोजागी घंटानाद आंदोलन छेडण्यात आल्याचे सुद्धा यावेळी सांगण्यात आले.