जेजुरी : ‘होम टू होम’ सर्व्हेक्षणात 13 हजार नागरिकांची तपासणी

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून त्यावर प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी जेजुरी शहरात दोन दिवस माझे कुटुंब माझी जवाबदारी या उपक्रमाअंतर्गत 13,405 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणीत 63 संशयित रुग्ण आढळून आले या पैकी 19 जनांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार रुपाली सरनोबत, जेजुरी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पूनम कदम यांनी दिली.

पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली दि 17 व 18 या दोन दिवसात 80 पथकातील डॉक्टर्स, आरोग्य सेवक, शिक्षक, पालिका आधिकारी, कर्मचारी आदी 180 जणांनी शहरातील 13,405 नागरिकांची ऑक्सिमीटर व थर्मल च्या साहाय्याने आरोग्य तपासणी केली. या तपासणीत 63 नागरिक संशयित आढळून आले, त्यांचे स्वब घेण्यात आले. यापैकी 19 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.

जेजुरी पालिकेने केलेले आवाहन व जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी केलेली जनजागृती याला जेजुरीकरांनी प्रतिसाद देऊन तपासणी करून घेतली. शिक्षक, डॉक्टर्स, आरोग्य सेवक, नगरपालिका आधिकारी, कर्मचारी, पोलीस यांनी या मोहिमेत परिश्रम घेतले. जेजुरी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पालिकेचे विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई व कार्यकर्त्यानी या पथकाने केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल समाधान व्यक्त करून त्यांचा सन्मान केला.