जेजुरी : माघ पौर्णिमा यात्रा निमित्ताने जेजुरीत लाखो ‘भाविक’

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे ) – अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले जेजुरी मध्ये माघ पौर्णिमा यात्रा निमित्ताने लाखो भाविक जेजुरीत दाखल झाले आहेत. यामध्ये मुख्यत: कोळी समाज बांधव आपापल्या खंडोबा देवाच्या पालख्या घेऊन देवभेटीसाठी मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत.

माघ पौर्णिमा हा दिवस म्हाळसादेवींचा जन्मदिन मानला जातो. माघ शुद्ध पौर्णिमेस जेजुरी येथे दोन ते तीन दिवसांची मोठी यात्रा भरते तसेच दर तीन वर्षांनी कोळी समाज बांधव आपापल्या खंडोबा देवाच्या पालख्या घेऊन देवभेटीसाठी जेजुरीत दाखल होतात. कोळीगीतांच्या नृत्यावर नाचत, वाजत, गाजत आणि भंडाऱ्याची उधळण करीत मोठ्या थाटामाटात पालखी देवभेटीसाठी गडावर नेली जाते. या उत्सवाला शिखरी काठी उत्सवही म्हटले जाते.

संगमनेरकर होलम राजाची शिखर काठी, सुपे ता . बारामती येथील खैरे पाटलांची शिखर काठी आणि महाराजा होळकर यांची जेजुरीतील शिखर काठी या तिन शिखरी काठ्यांना विशेष मान आहे. दरवर्षी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी या तीन शिखरी काठ्यांसह राज्याच्या विविध भागातून आलेल्या प्रासादिक शिखरी काठ्या मुख्य मंदिराच्या कळसाला टेकविण्याचा मान आहे. या वर्षी दि. ९ फेब्रुवारी २०२० रोजी माघ पौर्णिमा येत असल्याने जेजुरी येथे मोठी यात्रा भरणार आहे. खंडोबा देवाच्या यात्रा मधील माघ पौर्णिमा यात्रा ही महत्त्वाची यात्रा मानली जाते.