जेजुरी : नाझरे धरण 100 % भरले

जेजुरी  : जेजुरी नाझरे (ता. पुरंदर) धरण शनिवारी (दि. 15) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून कऱ्हा नदी पात्रात 1900 क्‍युसेकने विसर्ग सुरू आहे.

धरणास एकूण 26 स्वयंचलित दरवाजे असून त्यापैकी दोन दरवाजातून जास्तीचा प्रवाह सुरू आहे तर इतर दरवाजावरून पाणी वाहत आहे. नाझरे धरण 100 टक्‍के भरल्याने शेतकरी वर्गातुन आनंद व्यक्त केला जात आहे. पुरंदर तालुक्‍यातील 28 गावांसह बारामती तालुक्‍यातील 16 गावांचा त्याचबरोबर जेजुरी नगरपरिषद, जेजुरी येथे असणारी औद्योगिक वसाहतीचा देखील पाणीप्रश्‍न सुटलेला आहे.

सोमर्डी, गराडे, चांबळी, भिवरी, बोपगाव, नारायणपूर या खोऱ्यामध्ये पावसाचा जोर तीन दिवसांपासून वाढल्याने धरण 100 टक्‍के भरले आहे. पुरंदरच्या पश्‍चिम खोऱ्यात पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात वाढ करण्यात येणार असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याचे शाखा अभियंता बी. एस. चौलग व विश्‍वास पवार यांनी सांगितले.

गेल्या पाच ते सहा दिवसांपासून धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पावसाची संततधार सुरू असून गराडे, पिलानवाडी, घोरवडी, वीर, संगम डॅम ही पुरंदर तालुक्‍यातील धरणे 100 टक्‍के भरली आहेत.