जेजुरी : स्वच्छ शाळा सुंदर शाळा स्पर्धेत पुणे ग्रामीण दक्षिण विभागात गुरोळी विद्यालय प्रथम

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – गुरोळी ( ता . पुरंदर ) येथील इंग्लिश स्कूल विद्यालयाने पुणे येथील किर्लोस्कर फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वच्छता सुंदर शाळा स्पर्धेत पुणे ग्रामीण दक्षिण विभागात प्रथम क्रमांक मिळविला. किर्लोस्कर फाउंडेशनच्या वतीने गेली अनेक वर्षे माध्यमिक शाळांसाठी स्वच्छ सुंदर शाळा स्पर्धा घेण्यात येत आहे.  कै. शंतनूराव किर्लोस्कर यांनी स्वच्छता व सौंदर्य याचा मंत्र सर्वांना दिला. याच उद्देशातून स्वच्छ सुंदर शाळा स्पर्धा घेण्यात आली.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण दक्षिण विभागाच्या पुरंदर, भोर, इंदापूर व बारामती या तालुक्यांमध्ये गुरोळी (ता . पुरंदर) येथील इंग्लिश स्कूलने स्वच्छ सुंदर शाळा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. विद्यालयांमध्ये मुलींसाठी असणारे स्वतंत्र व सर्व सोयींनी युक्त शौचालय, मुलींसाठी चेंजिंग रूमची स्वतंत्र व्यवस्था सार्वजनिक स्वच्छता, शालेय परिसर स्वच्छता, ग्रामस्वच्छता, विद्याथ्यांची गुणवत्ता, भौतिक सोयीसुविधा, निटनेटकेपणा, शिस्त या मूलभूत विषयांचा अभ्यास करून प्रथम क्रमांक देण्यात आला. मुलांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण व्हावी, यासाठी विद्यालय नेहमीच अग्रेसर असते. जबाबदार नागरिक घडविण्यासाठी आवश्यक गुण विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणे, जबाबदारी उचलण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे, यासाठी विद्यालय प्रयत्नशील राहते, असे मुख्याध्यापक रामदास जगताप यांनी सांगितले.

विभाग प्रमुख प्रदीप दुर्गाडे, वैशाली कुंजीर, हरिश्चंद्र खेडेकर, अरुण यादव, सुहास भुजबळ, मनोहर आंबले, सुषमा दरेकर, रूपाली खेडेकर, प्रदीप काळे, अश्विनी काळे, सुनील बधे, छगन खेडेकर व विठ्ठल वाघमारे यांनी नियोजन व संयोजन केले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/