जेजुरी : एस. एम. देशमुख यांना ‘आचार्य अत्रे’ पुरस्कार प्रदान

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – पत्रकार संरक्षण कायदा झाल्यानंतही महाराष्ट्रात पत्रकारावरील हल्ल्यांच्या घटना कमी झालेल्या नाहीत त्यामुळे या कायद्याची कडक आणि कठोर अंमलबजावणी व्हावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे प्रमुख एस.एम.देशमुख यांनी केली आहे.

पत्रकार संरक्षण कायदा व्हावा यासाठी मोलाचे योगदान दिल्याबद्दल पुरंदर तालुका पत्रकार संघाच्यावतीने एस.एम.देशमुख यांचा सोमवारी माजी मंत्री दादसाहेब जाधवराव यांच्या हस्ते आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला त्यावेळी देशमुख बोलत होते.

आपल्या भाषणात देशमुख पुढे म्हणाले, सतत बारा वर्षे संघर्ष केल्यानंतर राज्यात 8 डिसेंबर 2019 रोजी पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला खरा पण त्याची व्यवस्थित अंमलबजावणी होताना दिसत नसल्याने हल्लायंच्या घटना पुन्हा वाढल्या आहेत.मुंबईत गेल्या आठ दिवसात दोन पत्रकारांवर हल्ले झाले.

पोलिसांनीच केलेल्या हल्ल्यांची दखल गृहमंत्र्यांना घ्यावी लागली आणि संबंधित पोलिस अधिकार्‍यास निलंंबित केले गेले. परवा अकोल्यातही दोन पत्रकारांवर हल्ले झाले आहेत.मात्र हल्ले झाल्यानंतर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल होताना दिसत नाहीत.पोलीस त्यासाठी टाळाटाळ करतात त्यामुळं कायदा होऊनही त्याची व्यवस्थित अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ल्यांच्या घटना पुन्हा वाढल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष देऊन पत्रकारावर हल्ला झाल्यानंतर संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.त्यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ असेही देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. आचार्य अत्रे यांच्या नावाचा,आचार्य अत्रे यांच्या गावात आणि आचार्य अत्रे याचं नाव असलेल्या सभागृहात माझा सन्मान होतोय हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण असल्याचे स्पष्ट करून देशमुख यांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत पत्रकारांसाठी काम करीत राहण्याचं वचन यावेळी उपस्थित पत्रकारांना दिले.

सासवड हे आचार्य अत्रे याचं जन्मगाव आहे.असं असतानाही सासवडमध्ये आचार्य अत्रे यांचं भव्य स्मारक झालेलं नाही ही अत्यंत दुःखद गोष्ट असून सासवडमध्ये अत्रे याचं भव्य स्मारक व्हावं यासाठी पुढील काळात मराठी पत्रकार परिषद प्रयत्न कऱणार असल्याची ग्वाही देशमुख यांनी दिली.मराठी पत्रकार परिषद आणि सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या सततच्या पाठपुराव्यामुळं सिंधुदुर्ग नगरीत बाळशास्त्री जांभेकर याचं भव्य स्मारक उभं राहतंय त्याच धर्तीवर सासवड येथे आचार्य अत्रे याचं स्मारक व्हावं अशी अपेक्षा देशमुख यांनी व्यक्त केली.

आचार्य अत्रे हे मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष होते.1950 मध्ये बेळगावमध्ये झालेल्या मराठी पत्रकार परिषदेच्याअधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. अध्यक्षपदावरून बोलताना पत्रकारांवर होणारे हल्ले आणि पत्रकारांचा विविध पध्दतीनं आवाज बंद करण्याचा होत असलेला प्रयत्न हा मुद्दा त्यानी उपस्थित केला होता मात्र या घटनेला 70 वर्षे झाल्यानंतरही पत्रकारांवरचे हल्ले थांवावेत यासाठी पत्रकारांना लढे उभारावे लागत आहेत हे समाजस्वास्थ्यासाठी बरे नाही, समाजातील सुजाण मंडळींनी देखील माध्यमांच्या मुस्कटदाबीकडे कानाडोळा करून चालणार नाही कारण माध्यमांचा आवाज बंद झाला तर लोकशाहीच धोक्यात येईल असा इशारा देशमुख यांनी दिला.

यावेळी स्थानिक आमदार संजय जगताप यांचाही सत्कार कऱण्यात आला. आपल्या भाषणात त्यांनी आचार्य अत्रे यांचं भव्य स्मारक व्हावं यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्‍वासन दिले. अत्रे सभागृहाच्या परिसरात मोठी जागा उपलब्ध आहेत तेथेच हे स्मारक व्हावं यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी दिली. पत्रकारांचे इतर प्रश्‍न सभागृहात मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचाही आपण प्रयत्न करू असे आश्‍वासन त्यांनी दिले.

आपल्या भाषणात दादासाहेब जाधवराव यांनी पत्रकारांनी जनतेचा आवाज बणून त्याना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, निःपक्ष, निर्भिड पत्रकारिता करावी अशी सूचना केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक काळे यांनी केले. यावेळी परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, विभागीय सचिव बापुसाहेब गोरे, यांचीही भाषणं झाली. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर आणि पुरंदर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नाना भोंगळे तसेच जिल्ह्यातून आलेले पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते.